जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२५ । प्रसिद्ध असलेलं ज्येष्ठ वकील ॲड. उज्ज्वल निकम राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच जळगाव मध्ये आले होते. या विशेष प्रसंगी जळगाव शहरातील नागरिकांच्या वतीने भव्य नागरी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यादरम्यान बोलताना मंत्री पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणात २०१६ मधील एक किस्सा सांगितला.

त्यांनी म्हटले की, मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी पहिल्याच यादीत आपले नाव वगळण्यात आले होते, तेव्हा गिरीश महाजन मंत्री होते, पण त्यांनी कोणताही “वशिला” लावला नव्हता. पुढे त्यांनी सांगितले की, त्याच काळात त्यांनी अॅड. उज्ज्वल निकम यांना भेट दिली होती आणि निकम यांनी त्यांच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरे यांना फोन केल्यावरच ते मंत्री झाले होते. त्यांना सहकार मंत्रिपदाची संधी मिळाली होती. या आठवणीने वातावरणात हास्याची लहर पसरली.

विधी आणि न्यायाच्या बाबतीत जेव्हा अडचण येते तेंव्हा उज्ज्वल निकम असतात. आता दिल्लीच्या तख्तावर उज्ज्वल निकम नाव उज्ज्वल करतील.’असंही गुलाबराव पाटील म्हणाले
या प्रसंगी गिरीश महाजन यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आणि भाजप पक्षातील मूल्यांचा उल्लेख केला. त्यांनी नमूद केले की, ॲड. उज्ज्वल निकम यांना २०१९ मध्ये उमेदवारी देण्याचा विचार होता, परंतु ती शक्यता थोडक्यात हुकली. मात्र, २०२४ मध्ये पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आणि जरी ते कमी मतांनी हरले, तरी आता राष्ट्रपतींनी त्यांची थेट नियुक्ती केल्याने हे खरोखरच गौरवास्पद आहे. आता निकम मोदी-शहा यांच्या भवनात असतील, त्यामुळे थोडं “घाबरून” राहावं लागेल, असा उपरोधिक सूरही त्यांच्या भाषणात दिसून आला.









