जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२५ । पुण्यात एका हाय-प्रोफाईल रेव्ह पार्टीवर पोलिसांनी केलेल्या छापेमारीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आल्याच्या कारवाईमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान या कारवाईवरून एकनाथ खडसेंचे कट्टर विरोधक आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला. खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांनीच ही रेव्ह पार्टी आयोजित केली होती, असा गौप्यस्फोट महाजन यांनी केला आहे.

या रेव्ह पार्टी प्रकरणाबाबत माझा पोलिसांशी अद्याप संपर्क झालेला नाही. पण नाथाभाऊचे जावाई रेव्ह पार्टीत होते, असे समजले. तेच या रेव्ह पार्टीचे आयोजक असल्याची माहिती मला मिळाली आहे, असे महाजन म्हणाले. प्रांजल खेवलकर यांनीच या रेव्ह पार्टीचे आयोजन केले होते, अशी माहिती समोर आली आहे. तो काही ट्रॅप होईल असे वाटत नाही. खेवलकर हा ट्रॅप होईल, असे वाटत असेल तर त्याला खडसेंनी अलर्ट का केले नाही? असा सवाल महाजन यांनी उपस्थित केला.

या कारवाईत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ सापडले. त्यांना ताब्यात घेतले आहे. कालच नाथाभाऊने सांगितले चाळीसगावला गांजा कसा बोलत होते. त्यांचे जावईच कसे काय सापडले? मोठा विषय आहे, रेव्ह पार्टी हा विषय मोठा आहे. पाच का तीन महिला होत्या अशी माहिती मिलाली आहे. कुणी पलायन केले समोर येईल. मात्र चौकशी झाली पाहिजे, दोषींवर कारवाई झाली पाहिजे, असे महाजन म्हणाले.
संजय राऊतांची प्रतिक्रिया
दरम्यान या प्रकरणावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली. दोन दिवसांपासून खडसे हे सरकारच्या विरुद्ध खास करुन गिरीश महाजनांच्या विरोधात ठामपणे भूमिका मांडतात. ते पुराव्यांसह बोलतात. त्यानंतर पुढील २४ तासात ही रेव्ह पार्टीची कारवाई झाली. एकनाथ खडसेंनी जे मुद्दे मांडले, जे आरोप केले, त्याची चौकशी होत नाही. पण जो आरोप करतो त्याच्या घरावर धाडी घातल्या जातात. ही पार्टी, ती पार्टी, मग तुमचं काय सुरु आहे. तुमचा संपूर्ण भारतीय जनता पार्टी ही एक रेव्ह पार्टी आहे, असे संजय राऊत म्हणाले.









