जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावात अपघाताच्या घटना काही कमी होताना दिसत नसून अशातच कामावरून दुचाकीने घरी जाण्यासाठी निघालेल्या प्रौढाला भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने चिरडले. ही घटना रात्री राष्ट्रीय महामार्गावरील दूरदर्शन टॉवरच्या समोर घडली. पोलिसांनी ट्रकसह चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

नशिराबाद येथील रहिवासी शेख हारुन शेख रशीद मणियार (वय ४७, रा. मणियार मोहल्ला नशिराबाद, ता. जळगाव) हे जळगावातील नवीपेठ परिसरातील एका सायकल मार्टच्या दुकानावर कामाला होते. शुक्रवारी रात्री ८.३० ट्रकने वाजेच्या सुमारास काम आटोपून ते नेहमीप्रमाणे दुचाकीने (क्रमांक एमएच- १९, सीक्यू- ९७५८) घरी जात होते. त्यांना जळगावकडून भुसावळकडे जाणाऱ्या जोरदार धडक देत चिरडले.

शेख हारुन हे ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांच्या चेहऱ्याचा चेंदामेंदा झाला होता. अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत त्यांना मृत घोषीत केले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. ज्या ठिकाणी हा अपघात झाला तेथे प्रचंड खड्डे पडलेले आहेत. तसेच उंच टेकडी असल्याने समोरून येणारे वाहन दिसत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका अधिक निर्माण झालेला असल्याचे चित्र आहे.









