जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जुलै २०२५ । राज्य सरकारने जुन्या पीक विमा योजनेत सुधारणा करत नवीन पीक विमा योजना लागू केली आहे. जुन्या योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार उघडकीस आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

शेतकऱ्यांच्या विकासासाठी व शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक वाढवणारी नवी योजना सुरू करण्यात येत आहे. ‘कृषी समृद्धी’ योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधान परिषदेत दिली.

राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकार वेगळी योजना आणणार आहे का, असा प्रश्न आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी विधान परिषदेत केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री कोकाटे म्हणाले की, अनेक विमा कंपन्या आणि काही सीएससी केंद्रांमार्फत गैरप्रकार झाल्याचे आढळून आल्याचं सांगितलं. विमा कंपन्यांनी तब्बल १,००,००० कोटी रुपयांचा नफा कमावला.
इतके पैसे या विमा कंपन्यांना देण्यापेक्षा तेच पैसे थेट शेतकऱ्यांच्या शेतीतील भांडवली गुंतवणुकीसाठी का वापरण्यात येऊ नये, असे सांगत त्यांनी नव्या योजनेचे समर्थन केलं. ‘कृषी समृद्धी’ योजनेंतर्गत शेतकऱ्यांना अल्प दरात विमाकवच देण्यात येणार आहे.
नवीन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अत्यल्प दरात विमा कवच देण्यात येणार आहे. खरिपासाठी 2 टक्के, रब्बीसाठी 1.5 टक्के आणि नव्या पिकांसाठी 5 टक्के इतकी आकारणी करण्यात येईल. उर्वरित रक्कम राज्य शासनाकडून भरली जाणार आहे. या योजनेत विमा कंपनी बदलण्याऐवजी नियमांची काटेकोर अंमलबजावणी आणि पारदर्शक ट्रिगर प्रणाली ठेवण्यात आली आहे. सध्याचे ट्रिगर बदलणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.












