जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२५ । जळगावकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे निम्म्या जळगाव जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या गिरणा धरणाने पन्नाशी ओलांडली आहे. नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे गिरणा धरणात ५०.७६ टक्के साठा झाला आहे. यामुळे जिल्ह्याची भविष्यातील पिण्याच्या पाण्याची मिटली आहे.

सध्या जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली आहे. जिल्ह्यात दमदार पाऊस नसल्याने चिंता व्यक्त होत असताना गिरणातील समाधानकारक साठ्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. २० जून रोजी गिरणा धरणात २० टक्केच चिंता जलसाठा होता. तो आज अखेर ५०.७६ टक्क्यांवर गेला असून २१ दिवसात ३० टक्क्यांहुन अधिकने वाढ झाली आहे.

विशेष गेल्या वर्षी आजच्या दिवशी गिरणा धरणात केवळ ११.७४ टक्के जलसाठा शिल्लक होता. यामुळे चिंता वाढली होती. मात्र यंदा आजच्या दिवशी(१२ जुलै) गिरणा धरणाने पन्नाशी गाठली आहे. नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे गिरणा धरणाची लॉटरी लागली आहे.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे ठेंगोडा धरण ओव्हरफ्लो होवून त्यातून ८७१ क्सुसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्यानंतर गिरणाच्या जलसाठ्यात वाढ होण्यास सुरूवात झाली. ठेंगोडापाठोपाठ चणकापूर, पुनद, हरणबारी ही धरणे देखील ओव्हरफ्लो झाल्यानंतर त्यातील पाण्याचा विसर्ग वाढल्यानंतर गिरणा धरणाच्या जलसाठ्यात वाढ होवू झाली. धरणात येणारी आवक पाहता यंदाही सलग दुसऱ्या वर्षी गिरणा धरण १०० टक्के भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान दुसरीकडे जुलै महिन्याचा मध्यान्ह आला असतानाही जिल्ह्यातील ३ प्रकल्पात शून्य टक्के जलसाठा आहे. अग्नावती, भोकरबारी व बोरी धरणात थेंबभरही उपयुक्त साठा उपलब्ध नाही.
जिल्ह्यात दमदार पाऊस नसल्याने चिंता
एकीकडे गिरणाने पन्नाशी गाठली असताना दुसरीकडे जळगाव जिल्ह्यात पावसाचे दीड महिने होत आले तरी दमदार पावसाचा पत्ता नसल्याने चिंता वाढली आहे. पावसाने घेतलेला आखडता हात पाहता यंदाही दुष्काळाचे सावट घोंगावते की काय अशी भीती व्यक्त होत आहे. येत्या काळात दमदार पाऊस झाला नाही तर पिकांना मोठा फटका बसू शकतो. सध्या मान्सून अस्थिर असून, नागरिकांना क्षणोक्षणी बदलणाऱ्या वातावरणाचा अनुभव येत आहे. कमकुवत मान्सूनमुळे तापमानात चढ-उतार दिसून येत आहे. दरम्यान १३, १४ आणि १५ जुलै दरम्यान विविध भागांत दुपारनंतर मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे








