जळगाव लाईव्ह न्यूज । गेल्या काही वर्षात राज्याच्या राजकारणात झालेले मोठे भूकंप पाहायला मिळाले. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षात. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी तर राष्ट्रवादीत अजित पवार यांनी केलेल्या बंडामुळे या दोन्ही पक्षात वेगवेगळे गट बनले. सध्या दोन्ही पक्षाचा गट सत्तेत असल्याने त्यांच्या गटात सामील होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे .दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली असून मात्र यातच जळगाव जिल्ह्यात पाच माजी आमदारांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ‘सत्ताधारी’ गोटात प्रवेश केल्याने विरोधकांसाठी आगामी निवडणुकांमध्ये कस लागणार आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. मात्र, जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जागांवर महायुतीतील भाजपचेच दोन्ही उमेदवार निवडून आले. त्यापाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीतदेखील जळगाव आघाडीतील एकाही पक्षाचा उमेदवार निवडून न आल्याने या पराभवाने काँग्रेस, शिवसेना उबाठा व राष्ट्रवादी शरद पवार गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनोबल खचले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील या पक्षांमधील माजी आमदारांसह अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सत्ताधारी महायुतीमधील पक्षांची वाट धरली.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीनेदेखील विरोधकांमधील या नेत्यांसाठी पायघड्या घातल्याने मागील काही महिन्यांत जळगाव जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या पाच माजी आमदार महायुतीत डेरेदाखल झाले.
विरोधात राहून कार्यकर्त्यांची कामे पूर्ण होत नसल्याचे सांगत हे नेते सत्ताधारी पक्षात जात आहेत. सद्य:स्थितीत सत्ताधारी पक्षात सुरू असलेल्या पक्षप्रवेशांचा ओघ पाहता, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट व काँग्रेस या पक्षासाठी परीक्षा पाहणाऱ्या ठरण्याची शक्यता आहे.
सत्ताधारी पक्षात गेलेले माजी आमदार व नेते
नेते – सोडलेला पक्ष – प्रवेश झालेला पक्ष
गुलाबराव देवकर – राष्ट्रवादी शरद पवार गट – राष्ट्रवादी अजित पवार गट
डॉ. सतीश पाटील – राष्ट्रवादी शरद पवार गट – राष्ट्रवादी अजित पवार गट
कैलास पाटील – राष्ट्रवादी शरद पवार गट – राष्ट्रवादी अजित पवार गट
दिलीप सोनवणे – राष्ट्रवादी शरद पवार गट – राष्ट्रवादी अजित पवार गट
दिलीप वाघ – राष्ट्रवादी शरद पवार गट – भाजप
डॉ. अनिल शिंदे – काँग्रेस – भाजप
विष्ण भंगाळे (जिल्हाप्रमुख) -उद्धव सेना – शिंदेसेना









