जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जुलै २०२५ । आधीच महागाईने त्रस्त झालेल्या शेतकर्यांना रासायनिक खतांच्या किमतीला सामोरे जावे लागणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा डीएपी आणि पोटॅश यांसारख्या प्रमुख रासायनिक खतांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढलेल्या किमती, वाहतूक खर्च आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे घटलेले मूल्य ही या दरवाढीमागील प्रमुख कारणे असल्याचे सांगितले जात आहे.

खरीप हंगाम तोंडावर असताना खतांच्या किमती २०० ते २५० रुपयांनी वाढलेल्या दिसून आल्या. या दरवाढीचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक गणितावर होणार आहे. आधीच नैसर्गिक आपत्त्या, अनियमित पाऊस आणि शेतमालाला मिळणारा कमी भाव यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. त्यात आता खतांच्या वाढलेल्या किमतींमुळे पेरणीपासून काढणीपर्यंतचा खर्च वाढणार आहे. याचा परिणाम म्हणून, शेतकऱ्यांना पीक घेण्यासाठी अधिक कर्ज घ्यावे लागणार असून, ते कर्जबाजारी होण्याच्या गर्तेत ढकलले जाण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान युरिया या खताच्या किंमतीत वाढ झालेली नाही गेल्या वर्षी असलेले २६६ रूपयांचाच दर यंदाही असल्याचे सांगितले.

खतांमध्ये अशी झाली दरवाढ
खताचे प्रकार.. जुनी किंमत.. नवी किंमत
१०.२६.२६ : जुनी किंमत- १४७०, नवी किंमत – १७५०
१५.१५.१५ : जुनी किंमत- १४७०, नवी किंमत – १६५०
१९.१९.१९ : जुनी किंमत- १६७५, नवी किंमत – १८५०
१४.३५.१४ : जुनी किंमत- १७००, नवी किंमत – १८५०
२४.२४.० : जुनी किंमत- १७५०, नवी किंमत – १९५०







