जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यात विविध योजनांमध्ये ५ लाख ६५ हजार सौर कृषी पंप बसवले आहे. मात्र पंप बिघाड झाल्यास तक्रार कुठे करायची याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. मात्र सौर कृषी पंपाच्या बिघाडीबाबत तक्रारी मोबाइल अॅपवरूनही नोंदवण्याची सुविधा महावितरणने लाभार्थी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे.

पंप बिघडल्यास यापूर्वी वेबसाइटवरून तक्रार करणे, संबंधित पुरवठादार कंपनीच्या वेबसाइटवर तक्रार करणे किंवा महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर फोन करून तक्रार करणे असे तीन पर्याय महावितरणने दिले होते. आता मोबाइलवर महावितरणच्या अॅपद्वारे तक्रार करण्याची सुविधा दिली आहे. हे अॅप लोकप्रिय ठरले असून, त्याचा वापर वीज बिल जाणून घेणे, बिल भरण्यासह मीटर रीडिंग नोंदणी, वीज चोरी कळवणे, नादुरुस्त ट्रान्स्फॉर्मरची माहिती कळवणे अशा विविध कामांसाठी केला जात आहे. अॅपमध्ये ‘सौर पंप तक्रार’ वर क्लिक करून सौर कृषी पंपाविषयी तक्रार दाखल करता येईल. येईल. तक्रार नोंदवताना लाभार्थी क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक लिहिणे गरजेचे आहे.

तीन दिवसांत तक्रारीचे निवारण बंधनकारक
सौर कृषी पंप बसवल्यानंतर पंप चालत नसणे, सौर पॅनेलची नासधूस होणे, सौर ऊर्जा संच काम करत नसणे, सौर पॅनेल्सची किंवा पंपाची चोरी होणे अथवा पंपातून कमी दाबाने पाणी येणे अशा विविध तक्रारी शेतकरी करू शकतील. पंप संचाचा विमा उतरवण्यात आला आहे. शेतात सौर कृषी पंप बसवल्यानंतर पाच वर्षे त्याची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित पुरवठादार कंपनीवर आहे. शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवल्यानंतर तीन दिवसांत तक्रारीचे निवारण करणे बंधनकारक आहे. सर्व कंत्राटदारांना त्यांनी ज्या जिल्ह्यात पंप बसवले आहेत त्या जिल्ह्याच्या ठिकाणी सेवा केंद्र उभारणे बंधनकारक केले आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निराकरण झाल्यावर त्यांना मोबाइलवर संदेश मिळेल. तक्रारी व निराकरणाबाबत कंत्राटदार कंपन्यांच्या कामावर महावितरणच्या प्रत्येक मंडलाच्या अधीक्षक अभियंत्यांची देखरेख राहणार आहे.












