जूनमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस ; आता जुलै महिन्यात कसा असेल पाऊस? IMD कडून महत्वाचे अपडेट..

जुलै 1, 2025 11:55 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जुलै २०२५ । यंदा मान्सून मे महिन्यातच केरळनंतर महाराष्ट्रात दाखल झालाय. मे महिन्यात मुसळधार पाऊस झाल्यानंतर जून महिन्यात देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. आता जुलै महिन्यात देशात पाऊस कसा असणार आहे? याबाबत हवामान विभागाने महत्वाचे अपडेट दिले आहे. यंदा जुलैमध्येही दमदार पाऊस असणार आहे. देशभरात सरासरीपेक्षा जास्त म्हणजे १०६ टक्के पाऊस जुलै महिन्यात पडणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

rn1 julay

जून महिन्यात देशात सरासरी ओलांडणाऱ्या पावसाचा जोर जुलै महिन्यात कायमच राहण्याची शक्यता आहे. यंदाच्या जुलै महिन्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ के.एस.होसळीकर यांनी व्यक्त केली. देशात १०६% पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रात सर्वदूर चांगल्या पावसाचे संकेत असल्याने राज्यभर सरासरीपेक्षा अधिक पाऊस शक्यता आहे.

महाराष्ट्रातील पावसाची स्थिती?
दरम्यान यंदा मेच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून महाराष्ट्र्रात दाखल झाला होता. यांनतर मुसळधार पाऊस झाला. परंतु जूनच्या सुरुवातीलाच पावसाने ब्रेक घेतला होता. मात्र जूनच्या आठवड्यापासून राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला. मागील काही दिवसापासून राज्यातील विविध भागात पाऊस हजेरी लावली आहे. अनेक नद्या तुंडूब भरल्या असून, काही धरणं देखील ओव्हरफ्लो झाली आहेत. दरम्यान राज्यात जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी पावसाचा जोर ओसरणार असल्याचं चित्र आहे.

आज या जिल्ह्याना पावसाचा इशारा
आज मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतही हलक्यापासून मध्यम पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत देखील यलो अलर्ट दिला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत विजांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे. हवामान खात्याने येथेही यलो अलर्ट जाहीर केला आहे. दुसरीकडे विदर्भातील नागपूर, अमरावती आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. इतर विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मात्र फारसा पाऊस होण्याचा अंदाज नाही.

दरम्यान या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घ्यावी. दरम्यान, शेतकऱ्यांनी संभाव्य पावसाच्या पार्श्वभूमीवर आपल्या पिकांचं योग्य रितीनं संरक्षण करावं, असं आवाहन हवामान खात्याने केलं आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now