महाराष्ट्रात पुढचे चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज ; जळगावात कशी राहणार स्थिती?

जून 30, 2025 11:29 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२५ । पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनाऱ्यावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरातून वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. विशेष आजपासून जळगावमध्ये देखील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

rn30

राज्यात कुठं कुठे अलर्ट?
विदर्भात पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे, असा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सोमवारी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. संपूर्ण विदर्भ आणि रायगड आणि पुणे जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.

जळगावातही जोरदार पावसाची शक्यता?
जळगाव शहरासह जिल्ह्यात आज ३० जूनपासून पाऊस जोर धरण्याची शक्यता असून, जुलैतील काही दिवस पाऊस सक्रिय राहील, असा अंदाज वर्तवला आहे. जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाला असला तरी आतापर्यंत दमदार पाऊस झालेला नाही. रविवारी दिवसभर पावसाची शक्यता होती पण हुलकावणी दिली. सायंकाळी जिल्ह्यात काही प्रमाणात पावसाची शक्यता निर्माण झाली होती; पण तो बरसला नाही. गेल्या तीन दिवसांपासून दुपारी आकाशात काळ्या-पांढऱ्या ढगांची दाटी होते आहे. पण ते न बरसता पुढे जात असल्याने चिंता वाढली आहे. आता राज्यात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

जळगावातील आगामी पाच दिवस वातावरणाची स्थिती…
३० जून : मुख्यतः ढगाळ वातावरण तुरळक पाऊस
१ जुलै : मुख्यतः ढगाळ वातावरण
२ जुलै : ढगाळ वातावरण व वाऱ्यांचा वेग १५ ते २० किमीपर्यंत असणार
३ जुलै : काही अंशी ढगाळ वातावरण, तुरळक पावसाचा अंदाज
४ जुलै : मुख्यतः ढगाळ वातावरण तुरळक पाऊस

दरम्यान, मागच्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या असून पावसाकडे डोळे लावून बसले आहेत. जिल्ह्यात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. दररोज पावसाची स्थिती निर्माण होतेय. पण पाऊस हुलकावणी देत असल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले. ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे त्या शेतकऱ्यांनी तुषार सिंचनाद्वारे पिकाला पाणी देण्यास सुरुवात केली. पावसाने हजेरी न लावल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now