जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जून २०२५ । जळगाव शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून दिवसेंदिवस घरफोडीच्या घटना वाढत चालल्या आहेत. आता यातच पती-पत्नी ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या मुलीकडे गेले असताना चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा कापून ४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना पिंप्राळा परिसरात घडली.

दरम्यान, घरात चोरी झाल्याचे घरमालकाला ऑस्ट्रेलियात असताना मोबाइलवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज दिसणे बंद झाल्याने लक्षात आले. रामानंदनगर पोलिस ठाण्यात घरफोडी दाखल झाली. लीलाधर शांताराम खंबायत (वय ५१, रा. न्यू पार्वतीबाई काळेनगर, मोहाडी रोड) यांच्या तक्रारीनुसार त्यांचे साडू नरेंद्र दौलत वाघ (वय ५६, रा. मारोती पार्क, पिंप्राळा) यांच्या घराचा कडीकोयंडा कापून शनिवारच्या रात्रीतून (३१ मे ते १ जूनच्या पहाटे ३ वाजेदरम्यान) चोरी झाली आहे.

चोरट्यांनी देवघरातील कपाटातून ३० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन व १० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या असा ऐवज लंपास केला. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसांत घरफोडीचा गुन्हा दाखल झाला. तपास सहायक निरीक्षक संदीप वाघ हे करीत आहे.
चांदीच्या वस्तू तेथेच सोडून दिल्या
चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडल्यानंतर घरातील संपूर्ण कपाट, ड्रावर्क्स अस्ताव्यस्त केले. देवघरातील कपाटातून सोन्याच्या वस्तू घेतल्या. याच ठिकाणी असलेले चांदीचे चार ग्लास आणि चांदीच्या चार वाट्या मात्र तेथेच सोडून दिल्याचे समोर आले आहे.









