जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मे २०२५ । जळगाव जिल्ह्यात आठवड्यातून एक तरी लाचखोरीचा प्रकार समोर येत असून अशातच आता भुसावळात प्लंबरच्या लायसन्स नूतनीकरणासाठी लाच स्विकारताना एका अभियंत्यासह दोन कर्मचाऱ्यांना एसीबीने रंगेहात अटक केली. पाणीपुरवठा अभियंता सतीश सुरेशराव देशमुख, लिपिक शांताराम उखर्डू सुरवाडे (वय 57), आणि कर्मचारी शाम समाधान साबळे (वय 28) असे लाचखोरांचे नाव असून या कारवाईने खळबळ उडाली असून तिघांविरुद्ध भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

46 वर्षीय तक्रारदार हे प्लंबर असून, त्यांना दरवर्षी लायसन्सचे नूतनीकरण करावे लागते. यासाठी त्यांनी पाणीपुरवठा विभागात संपर्क साधला असता, कर्मचारी आरोपी शाम साबळे याने 700 रुपयांची लाच मागितली. यानंतर साबळेने पाणीपुरवठा अभियंता सतीश सुरेशराव देशमुख यांना कॉल केल्यानंतर त्यांनी सहाशे रुपये देण्यास सांगितले.

तक्रारीनंतर जळगाव एसीबीने सापळा रचून सुरवाडे याला सहाशे रुपये लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. त्यानंतर लाच प्रकरणात संलिप्त असलेल्या अभियंता देशमुख व कर्मचारी साबळे यांनाही अटक करण्यात आली. आरोपी देशमुखच्या घराची झडती घेण्यात आली असता काहीही आढळले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
रोख रक्कम आणि मोबाईल जप्त
या कारवाईत आरोपी शाम साबळे यांच्याकडून मोबाईल, अभियंता देशमुखकडून मोबाईल आणि 2,160 रुपये रोख, तसेच सुरवाडे यांच्याकडून एक हजार रुपये व मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. तिन्ही आरोपींविरुद्ध भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










