खंडणी प्रकरण भोवले : चाळीसगावच्या पोलीस निरीक्षकांची नियंत्रण कक्षात बदली, कर्मचारी निलंबित

मे 20, 2025 2:28 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२५ । जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावमध्ये कॉम्प्युटर व्यावसायिकाकडून एक लाख वीस हजारांची खंडणी घेतल्याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आमदार मंगेश चव्हाण यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत पोलिसांवर गंभीर आरोप केले. यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तडकाफडकी निर्णय घेत चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांची बदली नियंत्रण कक्षात केली आहे. तर गुन्हा दाखल केलेल्या अजय पाटील या पोलीस कर्मचाऱ्यास निलंबन केले आहे. या कारवाईने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

Maharashtra Police Bharati 2022

याबाबत असे की, चाळीसगाव शहरातील एका कॉम्प्युटर व्यवसायिकाकडून एक लाख वीस हजारांची खंडणी उकळल्याच्या प्रकरणी पोलीस कर्मचारी अजय पाटील याच्याविरुद्ध सोमवारी चाळीसगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव पोलीस ठाण्यात तब्बल चार तास ठिय्या दिला. त्यांनी संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तडकाफडकी निर्णय घेत पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांची बदली नियंत्रण कक्षात केली आहे. तर कर्मचारी अजय पाटील याचे निलंबन करण्यात आले आहे. पुढील तपासासाठी आवश्यक पावले उचलण्याचे डॉ.रेड्डी यांनी निर्देश दिले. दरम्यान पोलीस दलाच्या प्रतिमेला धक्का देणाऱ्या या प्रकरणामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत असून, पुढील तपास कसा व कोणत्या दिशेने होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment