Bhadgaon : शेतात मृतावस्थेत बिबट्या आढळून आल्याने खळबळ

मार्च 11, 2025 6:06 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । भडगाव तालुक्यातील निंभोरा शेतशिवारात एका शेतकऱ्याच्या मक्याच्या शेतात मृतावस्थेत बिबट्या आढळून आलाय. निंभोरा शिवारातील शेतकरी दिलीप धोंडू बाविस्कर हे आपल्या शेतात मक्याच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते.

bibtya 1

पाणी भरण्याच्या दरम्यान, त्यांना परिसरात तीव्र दुर्गंधी जाणवली. त्यांनी संशयास्पद ठिकाणी पाहणी केली असता, त्यांना एका झुडपाच्या बाजूला बिबट्याचा मृतदेह आढळून आला. त्यांनी तातडीने गावकऱ्यांना आणि वनविभागाला याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच भडगाव वनपरिक्षेत्र अधिकारी आणि त्यांची टीम घटनास्थळी पोहोचली. त्यांनी मृत बिबट्याचा पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली. बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट होण्यासाठी शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

निंभोरा आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर जाणवत होता. शेतकऱ्यांच्या सांगण्यानुसार, अनेकदा हा बिबट्या रात्रीच्या वेळी गुरेढोरे आणि पाळीव प्राण्यांवर हल्ला करत होता. काही लोकांनी तो पाहिल्याचेही सांगितले होते. मात्र, अचानक त्याचा मृतदेह सापडल्याने विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. बिबट्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment