जळगाव लाईव्ह न्यूज । १९ डिसेंबर २०२४ । जळगाव शहरात पुन्हा एकदा अपघाताची दुर्देवी घटना समोर आलीय. ज्यात भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले आहे. ही घटना अजिंठा चौफुलीजवळ घडली असून विठ्ठल पांडुरंग शेळके (वय ५५) असं मृत प्रौढाचे नाव आहे. दरम्यान अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या ट्रकचालकाला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

रामेश्वर कॉलनीत विठ्ठल पांडुरंग शेळके (वय ५५) हे पत्नी व दोन मुलांसह वास्तव्यास होते. ते बळीराम पेठेतील एका नाष्ट्याच्या दुकानात कामाला होते. रात्री काम संपल्यावर ते दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाले. अजिंठा चौफुलीवर सुसाट ट्रक चालकाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात विठ्ठल शेळके यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र ट्रक चालकाला लगेच परिसरातील वाहनधारकांनी अडवून पोलिसांना माहिती दिली.

एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ट्रक ताब्यात घेतला. तसेच अपघात स्थळावरून विठ्ठल शेळके यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. तपासणी अंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपघाताचे वृत्त रामेश्वर कॉलनी परिसरात कळताच शेळके कुटुंबीयांसह परिसरातील रहिवाशांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती.








