जळगाव लाईव्ह न्यूज । ६ डिसेंबर २०२४ । अमळनेर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. ज्यात अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या पतीचा पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने काटा काढला. तुषार चिंधू चौधरी (वय ३७ रा.मारवड ता.अमळनेर ह.मु. प्रताप मिल, अमळनेर) असे मयत पतीचे नाव आहे. याप्रकरणी प्रियकरासह मयताच्या पत्नीला पोलिसांनी अटक केलीय.

या घटनेबाबत असे की, अमळनेर शहरातील प्रताप मिल परिसरात तुषार चौधरी हा तरूण पत्नी पुजा, २ मुलांसह वास्तव्याला होता. गुरूवारी दि. ५ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेपासून तुषार हा त्याचा ओळखीचा असलेला सागर चौधरी याच्यासोबत अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथे गेले होते. त्यावेळी दोघांनी सोबत दारू पिली. दारूच्या नशेत दोघांमध्ये वाद झाला, यामध्ये दारूच्या नशेत सागर चौधरी याने तुषारच्या डोक्यात दोनवेळा दगड टाकून त्याचा निर्घृण खून करून पसार झाला होता.

तुषारचा मृतदेह आज शुक्रवारी अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील एमआयडीसी परिसरात आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. यात तुषार चौधरी याच्या डोक्यात गंभीर घाव असल्याचे दिसून आले. त्यानुसार पोलीसांनी चौकशीला सुरूवात केली. मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे संशयित आरोपी सागर चौधरी याला त्याच्या गावातून दोंडाईचाजवळच्या मालपूर येथून अटक केली. दरम्यान, हा खून अनैतिक संबंधातून केल्याची त्याने कबुली दिली.
त्यामुळे पोलीसांनी मयत तुषार चौधरी यांची पत्नी पूजा चौधरी हिलादेखील ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात मयत तरुणाचे चुलतभाऊ मधुकर धुडकु चौधरी (वय ५५, रा. मारवड) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेमागील इनसाईड स्टोरी
संशयित आरोपी पूजा तुषार चौधरी हिचे लग्नाआधीपासून नातेवाईक असलेल्या सागर चौधरी याच्यासोबत प्रेमसंबंध होते. मात्र पूजाच्या कुटुंबीयांनी तिचा विवाह तुषार चौधरी यांच्याशी लावून दिला. पुढे लग्नसंबंधातून त्यांना १ मुलगा, १ मुलगी झाले. वर्षभरापूर्वी पूजा हिचे परत सागरशी ओळख झाली. त्यात त्यांच्या भेटीगाठी सुरु होऊंन अनैतिक संबंध देखील सुरु झाले. यात सागरने पूजासोबत पळून जाऊन लग्न करण्याचे ठरविले. हि गोष्ट सागरच्या पत्नीला माहित झाल्यावर त्यांच्यात वाद होऊन सागरची पत्नी हि माहेरी निघून गेली. तर दुसरीकडे मात्र याचा राग मनात धरून, सागर व पूजा यांनी तुषारला संपविण्याचा कट रचला.








