पारोळ्यात दोन कार समोरासमोर धडकल्या; भीषण अपघातात पती-पत्नी जागीच ठार

डिसेंबर 2, 2024 11:35 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ नोव्हेंबर २०२४ । पारोळा तालुक्यात म्हसवे फाट्याजवळ दोन कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला असून यात एका दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. सुधीर देवीदास पाटील (वय-४८) आणि त्यांची पत्नी ज्योती सुधीर पाटील (वय ४४) दोन्ही रा. लोणी ता. पारोळा ह.मु. गुजरात राज्य असे मयत झालेल्या दाम्पत्याची नावे आहे. दरम्यान अपघातातील जखमींवर पारोळा कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

parola accident

याबाबत असे की, पारोळा तालुक्यातील लोणी गावातील रहिवाशी असलेले सुधीर पाटील हे आपल्या पत्नी ज्योती पाटील यांच्यासह गुजरात राज्यात वास्तव्याला होते. दरम्यान, लोणी गावातील नातेवाईकांचे ४ डिसेंबर रोजी लग्न असल्याने पाटील दाम्पत्य हे मुळ गावी जाण्यासाठी गुजरात राज्यातून आलेले होते. सोमवारी २ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पारोळा तालुक्यातील म्हसवे गावातील फाट्याजवळ सुधीर पाटील हे कार क्रमांक (जीजे ०५ आरएच १२४७) ने लोणी गावी जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरून पाटील हे कार वळवत असतांना जळगावकडून धुळेकडे जाणारी भरधाव वेगाने जाणारी ऑडी कार क्रमांक (डीडी ०३ के ६९०३) ने जोरदार धडक दिली.

या धडकेत गुजरात येथून कारमध्ये आलेले दाम्पत्य जागीच ठार झाले. हा अपघात इतका भीषण होता की, गुजरात पासींग असलेली कारचा पुर्णपणे चुराडा झाला आहे. तर नाशिक येथील शिरीष लठ्ठा, उमेश लाने, चालक प्रवीण तागड, मिरज चांदे हे ऑडीमधील नागरिक जखमी झाले आहेत. त्यांना पारोळाच्या कुटीर रुग्णालय येथे हलविण्यात आले आहे. घटनेची महिती मिळताच लोणी, म्हसवे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या घटनेबाबत पोलीसात नोंद घेण्याचे काम सुरू होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now