जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२४ । जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात पाळधी येथील हिताची अस्टेमो ब्रेक सिस्टीम कंपनीत (आधीची केबीएक्स) काही महिन्यांपुर्वी झालेल्या आंदोलनाच्या विषयावरुन पुन्हा एकदा राजकारण सुरु झाले आहे. या आंदोलनाचा संदर्भ देत खोट्या माहितीचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक कंत्राटी कर्मचाऱ्यांनी ना.गुलाबराव पाटील यांना पाठिंबा देत त्यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला आहे. विरोधक कितीही खोटं बोलले तरी आमच्या अडचणींच्या काळात केवळ गुलाबभाऊंनीच आम्हाला मदत केली होती. त्याची परतफेड म्हणून आम्ही त्यांचा प्रचार करत असल्याचे संबंधित तरुणांनी सांगितले.
हिताची अस्टेमो ब्रेक सिस्टीम कंपनीत (आधीची केबीएक्स) काढून टाकलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे, तसेच कंत्राटी कामगारांना कायमस्वरुपी कामगारांप्रमाणे वेतनवाढ द्यावी आदी मागण्यांसाठी गेल्या काही महिन्यांपूर्वी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. यावेळी कंपनीचे व्यवस्थापन आणि कामगार संघटनेत चर्चा सुरु असतांना काही जणांनी हे आंदोलन भडकविण्यासाठी प्रयत्न केला होता, असा आरोप करण्यात येतो.
आंदोलनस्थळी विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांनी भेटी दिल्या होत्या मात्र पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी आंदोलनकर्त्यांसह व्यवस्थापन व जिल्हाधिकाऱ्यांशीही चर्चा केली. ना.गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने हे स्थानिक तरुणांना न्याय मिळला होता. मात्र आता या आंदोलनाचा खोटा संदर्भ देत पुन्हा एकदा धरणगाव तालुक्यातील तरुणांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप, त्यावेळी आंदोलन करणाऱ्या तरुणांनी केला आहे. आम्ही जेंव्हा अडचणीत होतो तेंव्हा विरोधक राजकारण करत होते मात्र गुलाबभाऊ आमच्या मदतीसाठी धावून आले, अशी प्रतिक्रिया संबंधित तरुणांनी दिली आहे.