जळगाव लाईव्ह न्यूज । २८ सप्टेंबर २०२४ । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री सोमवारी जळगाव दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. त्यांचा संभाव्य दौरा लक्षात घेता स्थानिक प्रशासन नियोजनात गुंतले असून, रविवारी या दौऱ्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. सोमवारी दुपारी १२ वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्य संकुलात ‘उद्यमात सकल समृद्धी, महाराष्ट्राची उद्योग भरारी’ कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यात उद्योजकांसाठी कार्यक्रम घेतला जाणार असल्याचे प्राथमिक नियोजन आहे. मात्र, या कार्यक्रमाव्यतिरिक्त शिवाजीनगरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्ळ्याचा भूमिपूजन सोहळा पार पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर मुक्ताईनगर येथे लाडकी बहीण योजनेचा मेळावा घेतला जाणार असल्याची माहिती स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिली. दरम्यान शुक्रवारी सायंकाळपर्यंत जिल्हा प्रशासनाला मात्र अधिकृतपणे दौरा प्राप्त झालेला नव्हता.