भुसावळात बालरंगभूमी परिषदेतर्फे लोककला प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात
जळगाव लाईव्ह न्यूज । अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था असलेल्या बालरंगभूमी परिषदेच्या वतीने शहरातील श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचलित अहिल्यादेवी कन्या विद्यालय व महाराणा प्रताप विद्यालय यांच्या सहकार्याने ‘जल्लोष लोककलेचा’ या उपक्रमातंर्गत लोककला प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.
महाराष्ट्र तसेच खान्देशातील लोककलांना उर्जितावस्था प्राप्त व्हावी. लोककला या केवळ मनोरंजनात्मक न राहता प्रबोधन, शिक्षणातून एक लोकचळवळ व्हावी. आपली संस्कृती, परंपरा व लोकवाद्यांची विद्यार्थी – विद्यार्थिंनींना माहिती व्हावी या उद्देशाने बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलम शिर्के सामंत यांच्या संकल्पनेतून ‘जल्लोष लोककलेचा’ हा उपक्रम संपूर्ण राज्यात राबविला जात आहे. या पार्श्वभूमीवर लोककलांचे सादरीकरणातून प्रशिक्षण शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे या उपक्रमाचे भुसावळ येथे श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचलित अहिल्यादेवी कन्या विद्यालय व महाराणा प्रताप विद्यालयात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री संत श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सोनूभाऊ मांडे, बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, महाराणा प्रताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश शिंदे, अहिल्यादेवी कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.मानसी कुलकर्णी यांच्या हस्ते कार्यशाळेचा नटराज पूजन व दीपप्रज्वलनाने शुभारंभ करण्यात आला. या कार्यशाळेत बालरंगभूमी परिषदेतर्फे शाहिर विनोद ढगे, अमोल ठाकूर, धनश्री जोशी, दर्शन गुजराथी, मोहित पाटील यांच्याद्वारे शाहिरी पोवाडा, भारुड, गोंधळ, वहीगायन, समूह गीत गायन आदी कलांचे सादरीकरणातून प्रशिक्षण देण्यात येवून, लोककलांविषयी माहिती देण्यात आली.
या कार्यशाळेला विद्यार्थी – विद्यार्थिंनी उत्स्फूर्त सहभागी होत सादरीकरणाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
या कार्यशाळेला शहरातील सुमारे ९०० विद्यार्थी – विद्यार्थिंनींनी सहभाग घेतला होता. शिबिराच्या यशस्वीतेसाठी बालरंगभूमी परिषदेचे पदाधिकारी व अहिल्यादेवी कन्या विद्यालयातील शिक्षक विनोद उबाळे, सौ.सोनाली वासकर, सौ.कोमल जोशी, आशिष निरखे, प्रशांत देवरे, सौ.पल्लवी पाटील, महाराणा प्रताप विद्यालयातील शिक्षक पंकज साखरे, सौ.अलका भटकर, वैभव पुराणिक, सौ.सुरेखा चौधरी आदींनी परिश्रम घेतले.