भयंकर! अटकेत असलेल्या वडिलांना भेटू न दिल्याने अल्पवयीन मुलाची सुसाइड नोट लिहून आत्महत्या

ऑगस्ट 3, 2024 12:03 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । वाघाच्या कातडीची तस्करी केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या वडिलांना भेटू न दिल्याने अल्पवयीन मुलाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हलखेडा (ता. मुक्ताईनगर) येथे शुक्रवारी सकाळी घडली. सोम रहिम पवार (१४) असे या आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्याने चार ओळींची सुसाइड नोटही लिहून ठेवली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

som pawar jpg webp

याबाबत असे की, हलखेडा येथील रहीम पवार हा इसम वाघाच्या शिकार प्रकरणात अटकेत आहे. त्याच्या सोबत त्याची बायको आणि इतर संशयित सुद्धा अटक आहेत. या गुन्ह्याच्या तपासकामी वनविभागाचे पथक संशयित रहीम पवार याला घेऊन आज सकाळी हलखेडा येथे आले होते.तपास पथकाला माझे वडिलांना भेटू द्या अशी मागणी संशयित रहीम पवार याचा मुलगा सोम रहीम पवार याने केली. मात्र वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला भेटू दिले नाही. उलट हाकलून लावल्याने सोम याने पोल्ट्री फॉर्म साठी उभ्या केलेल्या शेडमध्ये जाऊन गळफास घेतल्याचा आरोप मयत सोमचे नातेवाईक यांनी केला आहे.

या घटनेची खबर पोलीस पाटील अनिश पवार यांनी पोलिसांना देताच कुऱ्हा पोलीस चौकीचे सहाय्यक फौजदार संतोष चौधरी, पोलीस नाईक प्रदीप इंगळे, पो.कॉ. सागर सावे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच याप्रकरणाची कायदेशीर चौकशी करण्यात कोणतीच कसूर केली जाणार नाही असे आश्वासन मयत सोम याच्या नातेवाईकांना दिले. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.उ.नि. प्रदीप शेवाळे करीत आहेत.

नातेवाईकांचा आक्रोश
सोम याने घराच्या छताला गळफास लावून आत्महत्या केल्याची निदर्शनास येताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. सोम याच्या मृत्यूस वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारीच जबाबदार असल्याचा आरोप यावेळी नातेवाईकांनी केला.

मृत्यूदेह उचलण्यास विरोध
जोपर्यंत वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी येत नाही तोपर्यंत मृतदेहाला हात लावू देणार नाही अशी भूमिका मयत सोमच्या नातेवाईक आणि गावातील फासेपारधी जमातीने घेतली होती मात्र कुऱ्हा चौकीच्या पोलिसांनी त्यांची समजूत काढल्यानंतर त्यांनी मृतदेह उचलू दिला. त्यानंतर सोम चा मृतदेह मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन साठी नेण्यात आला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now