जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जून २०२४ । नापीक, कर्जबाजारीसह विविध कारणांमुळे शेतकऱ्यांमध्ये आत्महत्यासारखे प्रमाण वाढताना दिसत असून ही अत्यंत चिंतेची बाब आहे. अशातच एरंडोल तालुक्यातील खेडगाव कर्जबाजारी शेतकऱ्याने जीवनयात्रा संपविल्याची घटना समोर आली आहे. किसन मोरसिंग राठोड (वय ४६) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

खेडगाव (ता. एरंडोल) येथील किसन राठोड यांनी शेतीसाठी कर्ज काढले होते. मात्र घेतलेले हे कर्ज फेडता येत नसल्याने ते खूप दिवसांपासून नैराश्यात होते. शेवटी कर्जाला कंटाळून त्यांनी १५ जूनला घरी असताना विषारी द्रव प्राशन केले. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने कुटुंबीयांनी तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.

दरम्यान रुग्णालयात उपचार सुरु असताना १८ जूनला त्यांचा मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच कुटुंबीयांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला. त्यांच्या पश्चात पत्नी लताबाई आणि अनिल व सुनील असे दोन मुले आहेत. जिल्हा पेठ पोलिसात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.








