टँकरच्या धडकेत दुचाकीवरील 15 वर्षीय मुलाचा मृत्यू ; पाचोऱ्यातील घटना

जून 18, 2024 11:06 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जून २०२४ । पाचोरा तालुक्यातील अपघाताची एक धक्कादायक घटना समोर आलीय. टँकरच्या धडकेत दुचाकीवरील १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना दि. १७ जून रोजी घडली. राजवीर नरेंद्र भोसले (वय १५ रा. आमडदे ता. भडगाव) असे मयत मुलाचे नाव असून या घटनेवर पाचोरा पोलीस स्टेशन येथे आज मंगळवारी पहाटेपर्यंत काहीही दाखल नव्हते.

jalgaon mahanagar palika 10 jpg webp

पाचोरा तालुक्यातील आमडदे गावात वास्तव्यास असलेला राजवीर भोसले याचे वडील नरेंद्र भोसले यांचा वैद्यकीय व्यवसाय असल्याची माहिती मिळत आहे. सोमवारी दि. १७ जून रोजी नरेंद्र भोसले हे पाचोरा येथे पत्नी, मुलगा राजवीर आणि मुलगी यांच्यासह काही कामानिमित्त आलेले होते. त्यानंतर रात्री दहा वाजेनंतर घरी आमडदे येथे परत जात होते. वाटेत बांबरुड फाट्याजवळ पावसामुळे रस्ते निसरडे झाल्याने त्यांच्या वाहनाला अपघात झाला.

दुचाकीवरून सर्व खाली पडले. त्यात राजवीर हा जवळून जाणाऱ्या टँकर खाली येऊन चिरडून ठार झाला आहे. डोळ्यादेखतच मुलाचा मृत्यू झाल्यामुळे भोसले परिवाराला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान राजवीर आणि जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. तेथे राजवीर याला मयत घोषित करण्यात आले. तर नरेंद्र भोसले, त्यांच्या पत्नी व मुलीला किरकोळ खरचटल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान सदर अपघाताबद्दल पाचोरा पोलीस स्टेशन येथे मंगळवारी दि. १८ जून रोजी पहाटे ७ वाजेपर्यंत काहीही दाखल नव्हते. या भीषण अपघातामुळे रस्त्यांच्या दुर्दशेचा विषय पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. अपघातग्रस्त टँकर हे पाचोरा पोलीस स्टेशन येथे जमा झाले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now