जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव तालुक्यातील मोहाडी येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून ज्यात आठ वर्षीय मुलीच्या पायात बंदुकीची गोळी आढळून आली. हा प्रकार तब्बल सात महिन्यांनी समोर आला आहे. खासगी रूग्णालयातील डॉक्टरांनी मुलीच्या पायात गोळी आढळल्याचे लक्षात घेताच तातडीने उपचार सुरू केले. त्याचबरोबर त्यांनी या गंभीर प्रकाराची माहिती पालकांना देऊन त्यांना थेट जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात पाठवले. घटनेनंतर पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पालकांची सखोल चौकशी केली.

नेमका प्रकार काय?

जळगाव तालुक्यातील मोहाडी गावात आठ वर्षीय मुलगी आपल्या मैत्रिणींसोबत अंगणात खेळत असताना अचानक तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली. घाबरलेल्या पालकांनी तिला तातडीने मोहाडीतील नव्याने सुरू झालेल्या रुग्णालयात नेले. मात्र, रक्तस्त्राव वाढत असल्याने तेथील डॉक्टरांनी तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात उपचारासाठी हलविण्याचा सल्ला दिला.
प्रत्यक्षात शासकीय रुग्णालयात तिच्या जखमेवर फक्त टाके घालून मलमपट्टी करण्यात आली. आणि उपचार पूर्ण झाल्याचे सांगत तिला घरी सोडण्यात आले. परंतु, सात महिने उलटताच तिच्या पायात पुन्हा तीव्र वेदना सुरू झाल्या. बोटे काळी पडू लागल्याने पालकांनी तिला जळगाव शहरातील एका खासगी रूग्णालयात दाखल केले. तिथे तपासणीदरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली. मुलीच्या पायात अद्याप बंदुकीची गोळी अडकून असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केल्याने सर्वांना धक्का बसला. मात्र, मुलीच्या पायात गोळी कशी लागली, याबाबत पालकांनी काहीच माहिती नसल्याचे सांगितले.
या घटनेने सिव्हील हॉस्पिटलच्या उपचार पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मुलीला पहिल्यांदा सिव्हील हॉस्पिटलमध्ये नेले असता, तिथे योग्य तपासणी झाली असती तर ही गोळी तेव्हाच आढळली असती. मात्र, तात्पुरत्या उपचारांमुळे हा प्रकार सात महिन्यांनंतर उघड झाला. यामुळे मुलीच्या जीवाशी खेळ झाल्याची टीका होत आहे. तसेच, या प्रकरणात गोळी चालवण्याचा गुन्हा लपवला गेल्याची शक्यताही पोलिस तपासत आहेत.
दरम्यान पालकासंह मुलीला पायाला गोळी कशी लागली किंवा ती कोणी झाडली, याविषयी काहीच माहिती नसल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. सखोल चौकशीतून खरा काय तो प्रकार समोर येईल. त्यानंतर दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे.








