जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२२ । भुसावळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी नदीतील बंधाऱ्याने तळ गाठला होता. यामुळे शहरात टंचाईचे ढग गडद झाले होते. मात्र, मध्य रेल्वे प्रशासन व भुसावळ शहरासाठी हतनूर धरणातून ८.७० दलघमी आवर्तन मिळाल्याने शहरातील टंचाईचे सावट निवळले. आता पूर्वीप्रमाणे आठवड्यातून किमान एक दिवस पाणीपुरवठा शक्य होईल.
बंधाऱ्यात केवळ दहा दिवसांचा साठा शिल्लक असल्याने पालिकेने हतनूर धरणातून आवर्तनाची मागणी केली होती. यानुसार भुसावळ शहर आणि भुसावळ रेल्वे प्रशासन या बिगर सिंचन पाणीवापर संस्थांसाठी ८.७० दलघमी आवर्तन सोडण्यात आले आहे. तापमानामुळे पालिकेच्या बंधाऱ्यातील बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. यामुळे एरवी आवर्तन मिळाल्यानंतर २८ ते ३० दिवस टिकणारा जलसाठा आता केवळ २५ दिवसांपर्यंत टिकेल, असा अंदाज आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर व पाण्याची नासाडी थांबणे गरजेची आहे.