⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

यावलात ५० हजारांची वीजचोरी; चौघांवर गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । १० डिसेंबर २०२१ । यावल शहरात वीज महावितरण कंपनीकडून विविध ठिकाणी तपासणी केल्यानंतर चार ठिकाणी वीज चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यात भुरला रेंजला बारेला, बाटा नवसिंग बारेला व दुरसिंग साट्या बारेला यांनी मागील सहा महिन्यांपासून ८ हजार ५७ रुपयांची ३९३ युनिट वीज चोरी केल्याचे उघडकीस आले. तसेच भरत धनसिंग चौधरी यांनीही मागील २४ महिन्यांपासून ४२ हजार ७५८ रुपयांची २ हजार ३८१ युनिट वीज घरातील विद्युत उपकरणांसाठी अनधिकृतपणे म्हणजे चोरून वापरल्याचे निष्पन्न झाले हाेते. त्यानंतर त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. परंतु, त्यांनी दंडाची रक्कम अदा न केल्याने या चौघांविरुद्ध ५० हजार रुपयांची वीज चोरी केल्याप्रकरणी वीज महावितरणचे सहाय्यक अभियंत्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येथील पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात २० ऑक्टोबर व १९ नोव्हेंबर रोजी शहरात विशेष तपासणी मोहीम राबवली होती. त्यातनंतर संबंधीतांना
नाेटीस बजावूनही दंड स्वरुपात वीज बिल भरले नाही. त्यामुळे या चौघांना एकूण ५० हजार ८१५ रुपयांचे वीज बिल दंड स्वरुपात भरण्याबाबत नाेटीस बजावण्यात आली हाेती. मात्र त्यांनी वेळेत हे वीज बिल अदा न केल्याने त्यांच्या विरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार महेंद्र ठाकरे करत आहेत.