जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑगस्ट २०२१ । जळगाव शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार वासुदेव सोनवणे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित पार्टीत ‘ओ शेठ’ गाण्यावर भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष आणि प्रहार पक्षाचे विभागीय अध्यक्ष अनिल चौधरी यांच्यासोबत ‘डान्स केला म्हणून शहर पोलीस ठाण्याच्या पाच पोलिसांची उचलबांगडी करण्यात आली आहे. ५ कर्मचाऱ्यांना नियंत्रण कक्षात जमा करण्यात आले असले तरी त्यांना नाचण्यास प्रोत्साहन देणाऱ्या इतरांचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार वासुदेव सोनवणे हे दि.३१ जुलै रोजी पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले. शहर पोलीस ठाण्यात आयोजित कार्यक्रमात त्यांना जंगी निरोप देण्यात आला. सेवानिवृत्ती निमित्त रविवारी दुपारी रेल्वे स्टेशन परिसरात एका मॉलच्या सभागृहात पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पार्टीत पोलीस दलातील कर्मचारी, सोनवणे यांचा मित्रपरिवार सहभागी झाले होते.
पार्टी रंगात आली असता भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी हे शुभेच्छा देण्यासाठी पोहचले. नेमके त्याच वेळी ‘मैं हू डॉन’ गाणे वाजले आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांनी ‘इथे फक्त पोलीसच आहे, अतत्त्तनिलभाऊ डान्स होऊन जाऊ द्या’ अशी गळ घातली. ‘ओ शेठ तुम्ही नादच केला थेट’ या गाण्यावर अनिल चौधरींनी ठेका धरला आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांनी सोबत दिली. एका पोलीस कर्मचाऱ्याने इतर पोलिसांना देखील नाचण्यास प्रोत्साहित केले.
अनिल चौधरी यांच्यासोबत काही पोलिसांनी केलेल्या डान्सचा व्हिडीओ सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. यात प्रफुल्ल धांडे व विजय निकुंभ यांच्यासह इतर सहभागी दिसून येत आहेत. हा व्हिडीओ पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्यापर्यंत पोहचला. सायंकाळी त्यांनी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय येरुळे यांना तोंडी आदेश देऊन पाच पोलिसांना कंट्रोल रूम जमा केले आहे. कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये सहायक फौजदार केदार, हवालदार विजय निकुंभ, प्रफुल्ल धांडे, योगेश पाटील व गणेश पाटील यांचा समावेश आहे. पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी याबाबत जळगाव लाईव्हला दुजोरा दिला आहे.
दरम्यान, पार्टीत पोलिसांना नाचायला प्रोत्साहित करणाऱ्या इतर पोलिसांवर आणि जो व्हिडीओ समोर आला नाही त्यातील कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलीस प्रशासन पार्टीत कोण-कोण उपस्थित होते याच्या चौकशीकामी तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासणार का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.