जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदावर कोणाची वर्णी लागणार आणि कोणाचा पत्ता कट होणार, याकडे जळगावातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सातपैकी पाच स्वीकृत नगरसेवकांच्या नावांची यादी आज छाननीत निश्चीत करण्यात आली असून उर्वरित दोन जागांबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित ठेवण्यात आला आहे.

दोन दिवसांपूर्वी महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी विविध पक्षांनी आपापली नावे सादर केली होती. सात जागांसाठी एकूण नऊ जणांचे प्रस्ताव दाखल झाले होते. भाजपकडून चार जागांसाठी पाच नावे देण्यात आल्याने एका नावाचा निर्णय प्रलंबित राहणार हे स्पष्ट झाले होते, तर शिवसेनेकडून दोन नावे सादर करण्यात आली होती.

दरम्यान, आज महापालिकेत महापौर दीपमाला काळे, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे आणि विविध गटनेत्यांच्या उपस्थितीत छाननी प्रक्रिया पार पडली. या छाननीत भाजपचे डॉ. राधेश्याम चौधरी, प्रदीप रोटे व रमेश मताणी तसेच शिवसेनेचे हर्षल मावळे आणि नरेंद्र सोनवणे यांच्या नावांना मंजुरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
तर, काही उमेदवारांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्याने त्यांना दुरुस्ती करण्यासाठी दोन एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली. तर, शिवसेना-उबाठा पक्षाच्या गटनेतेपदाचा वाद हा विभागीय आयुक्तांकडे गेला असल्याने त्यांचा प्रस्ताव देखील प्रलंबीत ठेवण्यात आला आहे. त्यामुळे उर्वरित दोन जागांबाबत अंतिम निर्णय येत्या काही दिवसांत होण्याची शक्यता आहे.








