⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

बँक खात्यात चुकून आलेले 38 लाख केले परत; रावेरच्या व्यापाऱ्याचा प्रामाणिकपणा

जळगाव लाईव्ह न्यूज | १ नोव्हेंबर २०२३ | आजकाल कुणाचे ५०-१०० रुपये हरविले तर ते परत मिळत नाहीत. मात्र रावेर तालुक्यातील प्रीतम अरविंद झोपे (रा. थोरगव्हाण) यांनी त्यांच्या बँक खात्यात चुकून आलेले तब्बल ३८ लाख रुपये परत केले आहे. एवढी मोठी रक्कम कुठलीही लालसा न बाळगता परत करणाऱ्या श्री. झोपे यांच्या प्रामाणिकतेचे सर्वत्र कौतूक करण्यात येत आहे.

तांदलवाडी (ता. रावेर) येथील ‘युनियन बँक ऑफ इंडिया’च्या शाखेत खातेदार प्रीतम अरविंद झोपे (रा. थोरगव्हाण) यांचे बचत खाते असून, त्या खात्यात तब्बल ३८ लाख रुपये जमा झाले. तसा मेसेज त्यांच्या मोबाईलवर आला. आपल्या खात्यात कुणीही इतकी मोठी रक्कम पाठवू शकत नाही, हे त्यांना माहित असल्याने त्यांनी तत्काळ बँकेशी संपर्क साधला. आपल्या खात्यात आलेली रक्कम नजरचुकीने जमा झाली असल्यास माहिती बँकेच्या अधिकाऱ्यांना दिली.

त्यानंतर बँक अधिकाऱ्यांनी ही रक्कम कोणाची आहे, याची चौकशी केली असता ती रक्कम इंदूर येथील व्यापारी गौरव अग्रवाल यांची असल्याचे कळले. त्यानंतर गौरव अग्रवाल यांच्याशी संपर्क करण्यात आला. येस बँकेमार्फत आरटीजीएस करताना चुकून झोपे यांचा खाते क्रमांक टाकला गेल्याने ही रक्कम त्यांच्या बचत खात्यात जमा झाली. सदर बाबेची खातरजमा झाल्यानंतर चुकून खात्यात जमा झालेली रक्कम संबंधित खात्यातवर परत वर्ग करावी, असे पत्र श्री.झोपे यांनी बँकेला दिले. आता त्यांना ही रक्कम परत केली जाणार आहे.

प्रीतम हे थोरगव्हाण येथील पोलिस पाटील अरविंद झोपे यांचे पुत्र आहेत. श्री. झोपे यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. झोपे यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल अग्रवाल यांनी झोपे यांचे कौतुक केले आहे आणि झोपे परिवाराला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे.