‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा २८ वा प्रयोग दणक्यात! शिरसोलीत ७०० हून अधिक विद्यार्थ्यांनी लुटला आनंद

जुलै 21, 2026 5:39 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नाट्यरंग जळगाव निर्मित, विद्यार्थ्यांमध्ये संस्कार आणि मूल्ये रुजवणारे अत्यंत लोकप्रिय बालनाट्य ‘गाठोड्याचं गुपित’ याचा २८ वा प्रयोग पद्मालय इंग्लिश मीडियम स्कूल, शिरसोली येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. संस्थेच्या वतीने हा प्रयोग विद्यार्थ्यांना पूर्णपणे विनामूल्य दाखवण्यात आला, ज्याचा शाळेतील सुमारे ७०० विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद देत आनंद घेतला.

sr

‘गाठोड्याचं गुपित’ हे केवळ मनोरंजक नाटक नसून, विद्यार्थ्यांच्या कोवळ्या मनावर नैतिक मूल्यांचे संस्कार घडवणारे, जीवनमूल्यांची जाणीव करून देणारे आणि अंतर्मूल्यांचे आकलन घडवणारे एक प्रभावी माध्यम ठरत आहे. याचे विचारप्रवर्तक कथानक आणि हृदयस्पर्शी मांडणी यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक व पालकांकडूनही या बालनाट्याला मोठी पसंती मिळत आहे.

राज्यस्तरावरील विविध नाट्यस्पर्धांमध्ये अनेक प्रतिष्ठित पारितोषिकांनी गौरविण्यात आलेल्या या बालनाट्याचे लेखन आणि दिग्दर्शन नाट्यरंग जळगाव संस्थेचे संचालक अमोल अरुण ठाकूर यांनी केले आहे. दर्जेदार आशय, प्रभावी सादरीकरण आणि उत्तम संदेश यामुळे या बालनाट्याचा यशस्वी प्रवास अविरत सुरू असून, शिरसोली येथील प्रयोगही विद्यार्थ्यांच्या अफाट दाद मिळवत संस्मरणीय ठरला.

या नाटकात प्रभूदत्त दुसाने आणि राशी पडलवार या दोन प्रतिभावान बालकलावंतांनी आपल्या सुरेख अभिनयाने रंगमंच गाजवला. तसेच, नाटकाची रंगमंच व्यवस्था प्रणित जाधव, पीयूष भुक्तार, प्रणव जाधव, अथर्व रंधे आणि दिशा ठाकूर यांनी अत्यंत यशस्वीरीत्या सांभाळली.

संस्थेचे संचालक निषादराज रंगराव बारी आणि अध्यक्षा श्रीमती भारती रंगराव बारी यांच्या विशेष प्रयत्नांतून हा प्रयोग विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती चौधरी यांनी कलावंतांच्या संपूर्ण संघाचे मनःपूर्वक कौतुक केले. या प्रसंगी शाळेतील इतर शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now