जळगाव शहर

भटक्या कुत्र्यांचा त्रास ; महिन्याभरात जीएमसी मध्ये २६९ जणांनी घेतले इंजेक्शन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ जून २०२१ । जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागांमध्ये मे महिन्यात २६९ नागरिकांनी कुत्रे चावल्यामुळे दाखल होऊन इंजेक्शन व उपचार घेतले आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित झालेले आहे. मात्र नेत्र कक्ष (सी १) येथे आपत्कालीन विभाग सुरू ठेवण्यात आलेला आहे. या ठिकाणी अपघात, हाणामारी,  विषप्राशन व संबंधित रुग्ण प्राथमिक उपचार करण्यासाठी येत असतात.  त्यासह भटक्या कुत्र्याचा चावा यावरही उपचार घ्यायला येतात.  जिल्हाभरात भटक्या कुत्र्यांचा धुमाकुळ वाढला आहे. या आपतकालीन विभागांमध्ये मे महिन्यात एकूण २६९ व्यक्तींना कुत्रा चावल्यामुळे उपचार करण्यात आले आहे. यात २०२ पुरुष, ४२ महिला,  तर २५ लहान बालकांचा समावेश आहे. उपचार घेणार्‍यांमध्ये सर्वाधिक रुग्ण जळगाव शहरातील आहेत. तसेच महिन्याभरात ६ रुग्णांना उंदीर, मांजर, डुक्कर व अन्य प्राण्यांनी चावा घेतल्यामुळे उपचार करण्यात आले.

अशी घ्या काळजी

नागरिकांनी त्यांच्यासह लहान मुलांना भटक्या व पाळीव प्राण्यांपासून सावध ठेवावे. प्राणी चावल्यास तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी यावे. कुत्रा चावल्यावर जखम झाकू नका, जखम उघडीच ठेवा. स्वच्छ व भरपूर पाण्याने जखम धुवून घ्या, त्यानंतर रुग्णालयात उपचारासाठी यावे. आपत्कालीन विभागाला कक्ष क्र. सी १ मध्ये भेट द्यावी, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रशांत देवरे यांनी केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button