जळगाव लाईव्ह न्यूज । १२ नोव्हेंबर २०२१ । गर्भपात हा विषय जितका संवेदनशील आहे तितकाच गंभीर देखील आहे. याबद्दल ची जनजागृती करणे देखील तितकेच महत्वाचे झाले आहे. सुरक्षित गर्भपातासाठी जनजागृती करण्यासाठी पुणे येथील सम्यक संस्थेतर्फे प्रकल्प राबवण्यात येणार असून या मध्ये कार्यकर्त्यांची टीम तयार करून त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
आयसीएमआरच्या अहवालानुसार जळगावात ४०.३ टक्के स्त्रियांना प्रजनन आरोग्य संबंधित समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तर भारतात दरवर्षी दीड करोडपेक्षा अधिक महिला गर्भपात करत आहे. महिलांचे लैंगिक व प्रजनन आरोग्य हक्क आणि सुरक्षित गर्भपाताच्या सेवा याबाबत शासनाच्या या नैतिक जबाबदारीची मागणी लावून धरण्यासाठी सम्यक प्रकल्प सुरु आहे. यात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात काम केले जाणार आहे.
सम्यक या संस्थेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील मिळून १२० प्रशिक्षित कार्यकर्त्यांची टीम तयार करण्यात येणार आहे. या टीमद्वारे जजागृती करण्याचे काम केले जाणार असल्याची माहिती सम्यक कम्युनिकेशन अँड रिसर्च सेंट्रलच्या सल्लागार प्रीतम पोतदार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
जनजागृती करण्यासाठी गटबांधणी करण्यात येणार असून विविध क्षेत्रातील कार्यकर्ते एकत्र करून टीम तयार करणार असून त्यांना तीन दिवसांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या कार्यकर्त्यांकडून विभागात कृती कार्यक्रम घेतले जाणार आहेत. इच्छुक कार्यकर्त्यांनी स्त्री आरोग्य अभ्यासक प्रीतम पोतदार यांच्याशी संपर्क साधून आपली नोंदणी करावी.