⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

‘रायसोनी’च्या २०० विद्यार्थ्यांनी सर केले कळसुबाई शिखर

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ नोव्हेंबर २०२१ । जळगाव येथील रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयाच्या २०० विद्यार्थ्यांनी कळसूबाई हे तब्बल ५ हजार ४०० मीटरचे शिखर सर करीत वेगळा आदर्श प्रस्थापित केला आहे. दहा तासांच्या मोहिमेत या विद्यार्थ्यांनी कळसुबाई शिखर सर करण्याबरोबरच परतीचा प्रवास पूर्ण करत त्यांच्या शारीरिक क्षमतेचा परिचय करून दिला. या मोहिमेत विद्यार्थ्यांनी ‘भारत माता की जय, वंदे मातरम’ च्या जयघोषात देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला तसेच शिखरावर चढता चढता ठिकठिकाणी स्वच्छता मोहीमही राबविली.

विद्यार्थ्यांनी ऑलम्पिक विजेते खेळाडू, सीमेवर लढणारे जवान व शास्त्रज्ञाच्या कार्याला सलाम करत त्यांना ही मोहीम समर्पित केली. महाराष्ट्रात कळसूबाई शिखराचे गिर्यारोहकांच्या दृष्टीने आगळेवेगळे महत्त्व आहे. गिर्यारोहणाच्या अनेक मोठ्या मोहिमांपूर्वी गिर्यारोहक कळसूबाई सर करण्याचा सराव करतात. अत्यंत आव्हानात्मक मानल्या जाणारे हे शिखर चढण्यापूर्वी अनेक दिवस सराव करावा लागतो. रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रा. राहुल त्रिवेदी, प्रा.रफिक शेख, प्रा.विनोद महाजन, प्रा.गौरव जैन, प्रा.कल्याणी नेवे, प्रा.प्रशांत देशमुख, प्रा.दिपक शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली कळसुबाईची मोहिम यशस्वीपणे पूर्ण केली. या सर्व विद्यार्थ्यांचे रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रितम रायसोनी व संचालिका प्रा.डॉ. प्रिती अग्रवाल यांनी अभिनंदन केले.

कळसूबाई चढण्याचा अनुभव थरारक होता. खास गिर्यारोहकांची वाट म्हणून ओळखली जाणारी बारी या रस्त्याद्वारे मोहिमेला सुरुवात झाली. सकाळी ९.३० ते १० वाजताच्या सुमारास चढाईला सुरुवात झाली. दुपारी २.३० वाजताच्या सुमारास कळसूबाईच्या मोहिमेवर त्यांनी फत्ते मिळविली. रात्री दहा वाजेपर्यंत ते खाली परतले तसेच यावेळी टीम कम्युनिकेशन, नेटवर्किंगची भूमिका, जोखीम घेणे, जागेवरच निर्णय घेणे, रणनीती तयार करणे, क्षमता मॅपिंग, आव्हान हाताळणे, वेळेचे व्यवस्थापन, शिस्तीचे महत्त्व, ऐकण्याच्या कौशल्यांचे महत्त्व, कम्फर्ट झोन तोडणे, शारीरिक मर्यादांवर मानसिक ताकद असणे यासारख्या विविध बाबी विध्यार्थ्यानी आत्मसात केल्या. या मोहिमेदरम्यान मुसळधार पाऊस, पाऊलवाटा निसरड्या व चिखलमय झाल्या होत्या. परतीच्या वेळी दाट अंधार होता. मात्र विद्यार्थ्यांनी कुठेही न डगमगता मोहिम यशस्वीपणे पार केले.

भविष्यात विविध शिखरे सर करणार
कळसुबाई सर करत देशाच्या अमृतमहोत्सवनिमित्त तेथे तिरंगा फडकावत जिल्ह्याच्या अभिमानात भर घातल्याबद्दल विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक आहे. तसेच भविष्यामध्ये विविध शिखरे सर करण्याचा महाविद्यालयाचा मानस असून कळसुबाईवर राष्ट्रध्वज फडकवताना देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या लोकोत्तर व्यक्तीसह स्वतंत्र देशाचे नाव उज्वल करणाऱ्या जवान, खेळाडू, शास्त्रज्ञाविषयी विध्यार्थ्यानी कृतज्ञता व्यक्त केल्याने प्रत्येकाच्या मनात आत्मिक उत्साह निर्माण झाला आहे, अशी प्रतिक्रिया महाविद्यालयाच्या संचालिका प्रा.डॉ. प्रिती अग्रवाल यांनी दिली.