जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मार्च २०२२ । आई नातेवाइकांकडे दहाव्याच्या कार्यक्रमाला गेले असता १८ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना जळगावातील तांबापूरा परिसरात उघडकीस आली. जगदीश सुखदेव कुडपे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. एकुलत्या मुलाचा मृत्यू झाल्याने आईने एकच हंबरडा फोडला.

जगदीश याच्या वडीलांचे निधन झाले असून त्याची आई मोलमजुरी करून आल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होती. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी जगदीश सुरत रेल्वे मालधक्क्य़ावर हमाली काम करत होता.

शनिवारी (ता. १९) नेहमीप्रमाणे सकाळी तो कामाला गेला परंतु त्याठिकाणी काम नसल्याने तो घरी निघून आला. त्यानंतर दुपारच्या सुमारास घरात कोणीच नसल्याने जगदीश याने दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. दुपारी जगदीशला बघण्यासाठी त्याचे मामा भरत हटकर त्यांच्या घरी आले असता.
त्यांना आपल्या भाच्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनी शेजारी रवींद्र हटकर यांच्या मदतीने घराचा दरवाजा तोडून जगदीशला बाहेर काढीत शासकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करीत त्याला मयत घोषित केले. एकुलत्या मुलाचा मृत्यू झाल्याने त्याची आई संगीता यांनी एकच हंबरडा फोडला. त्याच्या पश्चात आई व दोन विवाहित बहिणी आहे.










