जळगाव लाईव्ह न्यूज । यावल तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेल्या हरिपुरा धरण परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरलेल्या १७ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. जयेश संजय फेगडे (रा.महाजन गल्ली यावल) असं मयत तरुणाचे नाव असून या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यावलमधील महाजन गल्लीतील रहिवासी असलेला जयेश फेगडे हा रविवारी आपल्या चुलत भाऊ आणि वहिनीसोबत सातपुड्याच्या कुशीत असलेल्या हरिपुरा धरण परिसरातील एका बागेत फिरण्यासाठी व पिण्यासाठी गेला होता. निसर्गरम्य आणि नयनरम्य वातावरणाचा आनंद घेत असताना जयेशला धरणाच्या साठवलेल्या पाण्यात पोहण्याचा मोह झाला.

कुठलाही विचार न करता तो पाण्यात उतरला, मात्र त्याला पाण्याच्या खोलीचा आणि अंदाज आला नाही. पाण्याचा अंदाज न आल्याने तो काही क्षणांतच खोल पाण्यात गढप झाला आणि बुडू लागला. जयेश पाण्यात बुडत असल्याचे दिसताच सोबत असलेल्या नातेवाइकांनी मदतीसाठी आरडाओरड केली. आवाज ऐकून आसपासच्या परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जयेशला पाण्यातून बाहेर काढले. मात्र, दुर्दैवाने तोपर्यंत त्याचा श्वास थांबला होता. ऐन उमेदीच्या वयात मुलाचा डोळ्यांसमोर असा अंत झाल्याने नातेवाइकांनी हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश केला.
घटनेनंतर जयेशचा मृतदेह पुढील वैद्यकीय व कायदेशीर प्रक्रियेसाठी यावल येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. तेथे शवविच्छेदन करून मृतदेह शोकाकुल नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. जयेशच्या या अचानक निघून जाण्याने फेगडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण यावल शहरात शोककळा पसरली आहे.











