जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ शहरातील गंगाराम प्लॉट परिसरातील रहिवासी असलेल्या एका सोळा वर्षीय विद्यार्थ्याचा तापी नदीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना शनिवारी दुपारी घडली. प्रतीक अनिल महाजन (वय १६) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. नुकताच दहावीचा निकाल लागून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या प्रतीकला अकरावीत प्रवेश घ्यायचा होता, मात्र त्यापूर्वीच त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने भुसावळ शहरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

मित्रांसोबत गेला होता नदीवर
मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक महाजन हा शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास तापी नदी परिसरात गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने तो नदीच्या पात्रात खोलवर बुडू लागला. सोबत असलेल्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याचा वेग आणि खोली जास्त असल्याने प्रतीकचा पाण्यात बुडून करुण अंत झाला.

दहावी उत्तीर्ण झाला, पण अकरावी पाहू शकला नाही!
अनिल महाजन यांचा एकुलता एक मुलगा होता. ते एका दुकानात कामाला आहे, तर प्रतीकची आई मजुरी करते. त्याला एक लहान बहीण आहे. प्रतीक महाजन याने नुकतीच झालेली दहावीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली होती. घरात त्याच्या या यशाचा आनंद होता आणि पुढील शिक्षणासाठी म्हणजेच अकरावीत प्रवेश घेण्यासाठी त्याच्या कुटुंबात हालचाली व चर्चा सुरू होत्या. मुलाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहत असलेल्या महाजन कुटुंबावर या घटनेने वज्राघात केला आहे. या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.











