⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

भेसळयुक्त दुधाने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; १३८२ लिटर दूध गटारीत ओतले

जळगाव लाईव्ह न्यूज| १० ऑगस्ट २०२३। चाळीसगाव शहरात भेसळयुक्त दूध आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शहरातील अनेक दूध डेअऱ्यांवर बुधवारी (ता. ९) प्रशासनाच्या विविध विभागातील अधिकाऱ्यांमार्फत एकत्रित छापे टाकण्यात आले. चाळीसगाव शहरातील दुधाच्या असलेल्या दुग्ध व्यवसायाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. परंतु, आता भेसळयुक्त दुधामुळे दुधाच्या दर्जावर प्रश्न चिन्ह उपस्थित होताना दिसून येतात.

भेसळयुक्त दुधामुळे आरोग्याच्या बाबतीत अनेक गंभीर आजार उद्धवतात. भेसळ करणारे घटक दीर्घकाळ घेतल्यास आरोग्यावर घातक परिणाम होतात कारण त्यामुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. अशा भेसळयुक्त दुधाचे साठे चाळीसगाव शहरात मोठ्या प्रमाणात आढळून आले. त्यामुळे सेवन करत असलेल्या दुधाच्या गुणवत्तेचा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसमोर उभा राहिलेला आहे.

शहरातील स्टेशन रोडवरील नामांकित दूध व दुग्धजन्य पदार्थ विकणाऱ्या आस्थापनांवर तसेच दूध सागर मार्ग परिसरातील दूध डेअऱ्यांवर अचानक छापा टाकण्यात आला. दूध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी गठीत केलेल्या भरारी पथकाने शहरातील दूध डेअरी व दूध संकलन केंद्रांमध्ये जाऊन दुधाच्या नमुन्यांची तपासणी केली.

तपासणीत अनेक ठिकाणी पाणी मिश्रित भेसळयुक्त दूध आढळून आले. जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या या भरारी पथकाने दुपारी दोनपर्यंत १ हजार ३८२ लिटर भेसळयुक्त दूध नष्ट केले आहे. मात्र भेसळयुक्त दूध आढळलेल्या डेअरी मालकांवर आस्थापनांवर कुठली कारवाई करण्यात आली, याची माहिती अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेली नाही.

दुधात प्रमाणापेक्षा जास्त पाणी आढळून आल्याने हजारो लिटर दूध नष्ट करण्यात आले. मात्र या दुधात युरिया किंवा अन्य केमिकल पदार्थ आढळले नसल्याचे प्रथमदर्शी दिसून आले आहे. परंतु दुधात मिश्रित केलेले पाणी कसे आहे, पाण्याची गुणवत्ता काय? असे अनेक प्रश्न आता निर्माण झाले आहे.

या भरारी पथकात अन्न व औषध प्रशासन विभाग, कृषी, पशुसंवर्धन मत्स्य, दुग्ध विकास विभाग, वजनमाप शास्त्र विभाग तसेच स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश होता. ही कारवाई अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त स. कृ. कांबळे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त श्‍यामकांत पाटील, उपनियंत्रक वजनमाप शास्त्र विभागाचे बी. जी. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा दुग्धविकास अधिकारी वाय. आर. नागरे यांच्या पथकात संतोष कांबळे व इतर विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या पुढे दुग्ध आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी ही मोहिम सुरू राहणार असल्याची माहिती वाय. आर. नागरे यांनी दिली आहे.