जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑगस्ट २०२५ । राजस्थानमधील प्रसिद्ध खाटू श्याम मंदिरात दर्शन घेऊन घराकडे परत येत असताना भाविकांच्या पिकवर काळाने घातला. पिकअप आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला असून यात ७ चिमुकल्यांचा समावेश आहे. तर या अपघातात ८ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे. हा अपघात राजस्थानच्या दौसामध्ये घडला.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी अपघातग्रस्त पिकअप खाटू श्याम मंदिराकडून येत होता. त्यावेळी रस्त्यावर उभ्या असणाऱ्या मालवाहू ट्रकला जोरात धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती, की पिकअपचा जागेवरच चक्काचूर झाला.

या अपघातात ७ चिमुकल्यांसह ११ जणांचा मृत्यू झाला. स्थानिकांनी तात्काळ धाव घेतल्यामुळे अनेकांचा जीव वाचला आहे. पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. या अपघातात जखमी झालेल्या सुमारे 7-8 जणांना जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असून उपचार सुरू आहेत.











