जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव महानगरपालिकेचा ढिसाळ कारभार आणि उदासीनता यामुळे मनपाचे दरवर्षी लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शहरातील जवळपास १,००० नवीन मालमत्तांना गेल्या दोन वर्षांपासून घरपट्टी आणि पाणीपट्टी लागूच करण्यात आलेली नाही. यामुळे महानगरपालिकेचे दरवर्षी ३० लाख रुपयांपेक्षा जास्त आर्थिक नुकसान होत उघडकीस आले असून, या प्रकारावर उपमहापौर मनोज चौधरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे.

उपमहापौर मनोज चौधरी यांच्या दालनात गुरुवारी मनपाच्या विविध विभागांची एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीला उपायुक्त धनश्री शिंदे, घरपट्टी विभाग, प्रभाग अधिकारी, नगररचना विभागाचे अधिकारी आणि नवीन घर मॅपिंग संबंधित कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीत मनपाच्या महसूल बुडतीचा हा गंभीर मुद्दा समोर आला.

शहरातील घरांचे अचूक मॅपिंग करण्यासाठी महानगरपालिकेने करोडो रुपये खर्च करून एका खासगी एजन्सीची नियुक्ती केली आहे. मात्र, करोडो रुपये घेऊनही या कॉन्ट्रॅक्टरकडून अपेक्षित दर्जाचे आणि प्रभावी काम होत नसल्याचे उपमहापौरांनी बैठकीत उघड केले. एजन्सीच्या या ढिसाळ कारभारामुळेच मनपाच्या हक्काच्या महसुलाला चुना लागत असल्याचे समोर आले आहे.
हलगर्जीपणा केल्यास थेट कारवाईचा इशारा
या गंभीर प्रकारानंतर उपमहापौर मनोज चौधरी यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना कडक आदेश दिले आहेत. शहरातील नव्याने उभ्या राहिलेल्या सर्व मालमत्तांचे तात्काळ सर्वेक्षण करून त्यांची घरपट्टी नोंदणी पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच मॅपिंग, बांधकाम परवानगी आणि घरपट्टी विभाग यांनी आपसात समन्वय वाढवून प्रत्येक नवीन बांधकामाची अचूक माहिती संकलित करावी, अशी सूचना केली. संबंधित एजन्सीकडून जबाबदारीने काम करून घ्यावे आणि यापुढे कामात हलगर्जीपणा आढळल्यास थेट संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशाराही उपमहापौरांनी दिला आहे.










