विद्यापीठाच्या ‘एमएसडब्ल्यू’चे १०० टक्के विद्यार्थी नापास?
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ सप्टेंबर २०२२ । कोविडच्या परिस्थितीनंतर ‘एमएसडब्ल्यू’च्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी जुलै २०२२ मध्ये अंतिम सत्राच्या परीक्षा दिल्या. मात्र, विद्यापीठाच्या तांत्रिक अडचणीमुळे भविष्याची दिशा आणि दशा ठरवण्याच्या वर्षात ( सोशिअल वेल्फेअर अँड सोशिअल जस्टिस ) या एकाच विषयात समाजकार्य महाविद्यालय तळोदा (नंदुरबार) येथील जवळपास १००% विद्यार्थी नापास झाले असून या विषयाची तात्काळ दखल घेऊन विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी अभाविपने विद्यापीठाचे कुलगुरू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तसेच ( रूरल अँड ट्रायबल मूव्हमेंट इन इंडिया ) या विषयात पेपर दिलेला असून देखील जवळपास ६० टक्के विद्यार्थी गैरहजर दाखविण्यात आलेले आहेत. विद्यापीठाने या विषयाची दखल व चौकशी करून विद्यार्थ्यांचे सुधारित निकाल लवकर लावावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान, मागणी पूर्ण न केल्यास विद्यार्थ्यांच्या आक्रोशाला सामोरे जावे लागेल, असा इशारा देखील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून याप्रसंगी देण्यात आला.
यावेळी निवेदन देताना अभाविप देवगिरी प्रदेश कार्यसमिती सदस्य निलेश हिरे, नंदुरबार जिल्हा सहसंयोजक योगेश अहिरे, अश्विनी गोसावी, भूषण घुगे, मयूर मराठे, दिपक पाडवी, हितेश साळी, अश्विन सुरवाडे आदी कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते.