‘शावैम’ रुग्णालयात शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा हृदय सन्मान!
जळगाव लाईव्ह न्यूज । ६ सप्टेंबर २०२२ । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांचा हृदय सन्मान करण्यात आला. तसेच, विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाविषयी भाषणे देऊन माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद होते. मंचावर वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, डॉ. अरुण कसोटे, डॉ. भाऊराव नाखले उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांनी दीपप्रज्ज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. यावेळी उपस्थित सर्व शिक्षकांचा विद्यार्थ्यांनी भेटकार्ड, पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
यावेळी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाची भाषणे दिली. यात त्यांनी आजच्या शिक्षण पद्धतीवर माहिती सांगून विविध विचारवंतांनी शिक्षणाविषयी मांडलेले विचार सांगितले. यावेळी शिक्षकांमधून डॉ. विलास मालकर, डॉ. इम्रान तेली यांनी मनोगत व्यक्त करीत, शिक्षण घेत असताना शिक्षकांचा सन्मान, आदर, त्यांच्या गौरवशाली कार्याचे स्मरण ठेवावे, असे सांगितले.
अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले की, विद्यालयात शिक्षकांच्या सहवासात विद्यार्थ्यांचे चरित्र उजळून निघत असते. मात्र त्यासाठी ज्ञानाची कठोर साधना, उत्तम अध्ययन पद्धती महत्वाची आहे. शिक्षक हा उत्तम मार्गदर्शक असतो. शिक्षक विद्यार्थ्यांना जीवन विकासाची दिशा देतो, असे सांगून विविध उदाहरणे देऊन डॉ. रामानंद यांनी शिक्षक दिनाविषयी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी डॉ. प्रवीण शेकोकार, डॉ. अनिल पाटील, डॉ. योगिता सुलक्षणे, डॉ. मोनिका युनाती, धनश्री पाटील, डॉ. स्वप्नील चौधरी, डॉ. आस्था गणेरीवाल, डॉ. रितेश सोनवणे, डॉ. प्रदीप लोखंडे, सफोरा तोहरींम, शाहनवाज खान, डॉ. विनेश पावरा, डॉ. चंदन महाजन, डॉ. संजय धुमाळे, जनसंपर्क सहायक विश्वजीत चौधरी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन कृतिका होसवाल हिने मानले. यावेळी तिन्ही वर्षाचे विद्यार्थी प्रतिनिधी राज सिंग, युवराज जाधव, वरद पाटील यांच्यासह विद्यार्थ्यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.