⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

यंदाच्या हंगामात बीटी कपाशी बियाणांच्या २५ लाख पाकिटांची गरज

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२२ । येत्या खरिपात जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र ५ लाख २० हजार हेक्टरपुढे जाण्याची शक्यता अाहे. कापसाला मिळालेल्या उच्चांकी दरामुळे लागवड क्षेत्र वाढणार असल्याने जिल्ह्यात खरिपात २५ लाख बिटी कापूस बियाणे पाकिटांची गरज पडणार आहे. बियाणे मागणी आणि पुरवठ्याबाबतचे नियाेजन कृषी विभागाकडून केले जात असून पुढील महिन्यात बाजारात बियाणे उपलब्ध हाेवू शकते.


सरत्या हंगामात कापसाचे उत्पादन ३५ टक्यापेक्षा अधिक घटल्याने कापसाची टंचाई हाेती. देशांतर्गत बाजारपेठेसाेबतच जागतिक बाजारात देखील कापसाची मागणी अधिक असल्याने कापसाचे दर प्रथमच अाजवरच्या प्रतिक्विंटल १२ हजार या उच्चांकावर पाेहचले अाहेत. अन्य काेणत्याही शेतमालापेक्षा कापसाचे दर अधिक असल्याने पुढील हंगामात कापसाचे लागवड क्षेत्र वाढणार अाहे. जळगाव जिल्ह्यात सध्या साडेचार लाखांवर असलेले कापसाचे क्षेत्र ५ लाख २० हजारांपुढे जाईल असा प्राथमिक अंदाज अाहे. उत्पादन घटले तरी बाजारभाव अधिक असल्याने शेतकऱ्यांचा कापसाकडे कल वाढला आहे. जिल्ह्यातील लागवडीचे संभाव्य क्षेत्र वाढणार असल्याने बाजारात २५ लाख बिटी कापूस बियाण्याची पाकिटांची गरज भासणार आहे. बियाणे कंपन्यांकडून कापूस उत्पादक जिल्ह्यात बियाणे पुरवठा करण्यासाठी कृषी विभागाकडे माहिती दिली जात आहे. त्यात जळगाव जिल्ह्यात विक्रमी २५ लाखांपेक्षा अधिक पाकिटांचा पुरवठा हाेवू शकताे. दरम्यान, बाेंडअळीच्या नियंत्रणासाठी बियाणे विक्रीच्या कालावधीवर शासनाने नियंत्रणे आणले आहे. त्यामुळे मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात कापसाची एकाच वेळी जिल्ह्यात विक्री सुरू होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात यंदा नाॅन बिटी बियाण्याची लागवड वाढणार
जिल्ह्यातील एकूण कापूस लागवडीच्या ५ टक्के लागवड ही नाॅन बिटी बियाण्याची असते. बिटी कापसावरील बाेंड अळीचे नियंत्रण हाेत नसल्याने शेतकऱ्यांचा कल नाॅन बिटी देशी बियाणेकडे वाढला आहे. त्यामुळे यंदाच्या खरिपात कापसाच्या देशी बियाणे लागवड क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.