जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२२ । जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत सन २०२१-२२ मध्ये खरेदी-विक्रीच्या व्यवहारांमध्ये अडीच हजारांवर वाढ नोंदवण्यात आली. मुद्रांक शुल्क वसुलीही ३४ कोटींनी वाढली आहे. या बाबद अधिक माहिती अशी कि, सन २०२१-२२ मध्ये शासनाने जिल्ह्याला प्रारंभी २४० कोटी रुपये मुद्रांक शुल्क वसुलीचे उद्दिष्ट दिलेले होते. फेब्रुवारी महिन्यात उद्दिष्ट १४ कोटींनी कमी करून २२६ कोटींचे देण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यात मार्चअखेर खरेदी-विक्रीचे ८६ हजार ४६६ दस्त नोंदवण्यात आले. त्यामधून २२९ कोटी रुपयांची मुद्रांक शुल्क वसुली झाली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जिल्ह्यातील मुद्रांक शुल्क वसुलीचे उद्दिष्ट सन २०१९-२० च्या (२१४ कोटी) तुलनेत सन २०२०-२१ मध्ये उद्दिष्ट ४२ कोटींनी कमी (१७२ कोटी) करण्यात आलेले होते. उद्दिष्टानुसार खरेदी-विक्रीच्या व्यवहारांसाठी दस्त नोंदणीत ८ हजारांवर वाढ झाली. मुद्रांक शुल्क वसुलीतही ११३.८९ टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली; मात्र उद्दिष्ट घटवल्यानंतरही सन २०१९- २०२० च्या तुलनेत २०२०-२०२१ मध्ये मुद्रांक शुल्क वसुलीत २३.६३ कोटींची घट नोंदवण्यात आली होती. सन २०२०मध्ये मार्च महिन्यापासून कोरोना महामारीला प्रारंभ झाला होता. त्यानंतर पहिला लॉकडाऊन करण्यात आला. दुय्यम निबंधक कार्यालये बंद होती. ५ मे रोजी दुय्यम निबंधक कार्यालये सुरू झाली. त्यानंतर दस्त नोंदणीला सुरुवात झाली. सन २०१९-२०२० मध्ये जिल्ह्याला २१४ कोटी रुपये मुद्रांक शुल्क वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या वर्षी खरेदी-विक्रीच्या व्यवहाराचे ७५ हजार ३३६ दस्त नोंदवण्यात आले. त्या माध्यमातून २१९.५२ कोटींचे मुद्रांक शुल्क शासनाला मिळाले. राज्य शासनाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी खरेदीदारांना मालमत्तांच्या व्यवहारांसाठी प्रोत्साहन देऊन रिअल इस्टेटलाही चालना देण्यासाठी १ सप्टेंबरपासून ३१ डिसेंबरपर्यंत मुद्रांक शुल्कात ३ टक्के तर १ जानेवारी ते ३१ मार्चपर्यंत २ टक्के सवलत देण्यात आली. त्यानंतरही मुद्रांक शुल्क भरणाऱ्यांना दस्त नोंदणीसाठी पुढील चार महिन्यांची मुभा देण्यात आली होती. सवलतीमुळे सन २०२०-२१ मध्ये मुद्रांक शुल्क वसुलीत वाढ नोंदवण्यात आली. या वर्षी १७२ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले. खरेदी-विक्री व्यवहाराची ८३ हजार ८४४ दस्त नोंदणी होऊन १९५ कोटींचा मुद्रांक शुल्क वसूल झाला. उद्दिष्टाच्या तुलनेत मुद्रांक शुल्क वसुलीत १०२.५८ टक्के वाढ झाली. |