⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

भारनियमना विरोधात भाजपाचा एल्गार

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ एप्रिल २०२२ । पंधरा दिवसांपासून राज्यात महावितरणने अघोषीत भारनियमन सुरु केले आहे. वीजेअभावी शेतातील पिक नष्ट होण्याची वेळ आल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. भारनियमनाविरोधात मंगळवारी भाजपने जिल्हाधिकारी कार्यालयावर शासनाच्या विरोधात ‘जनआक्रोश’ मोर्चा काढून एल्गार केला.

भाजप नेते गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले होते. निवेदन घेण्यासाठी अधिक्षक वीज अभियंता न आल्याने तसेच लेखी आश्वासनासाठी आमदार महाजन यांच्यासह भाजप खासदार, आमदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच ठीय्या आंदोलन सुरु केले. रात्री उशीरापर्यंत हे आंदोलन सुरु होते.

शिवतिर्थ मैदानापासून माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यामध्ये खासदार उन्मेष पाटील, रक्षा खडसे, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, मंगेश चव्हाण, जि.प.च्या माजी अध्यक्षा रंजना पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी, करण पवार यांच्यासह जिल्हाभरातून आलेले भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व अनेक शेतकरी, नागरिक या मोर्च्यात सहभागी झाले होते. शिवतिर्थ मैदानापासून काढण्यात आलेल्या या मोर्च्याचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालयसमोर झाला. तसेच याठिकाणी मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. समारोपाच्या ठिकाणी झालेल्या सभेत भाजपच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी राज्य शासन, उर्जामंत्री, पालकमंत्र्यांवर जोरदार टीका करत, राज्य शासनाचा निषेध व्यक्त केला.

भाजपचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर आपल्या विविध मागण्यांच्या निवेदनावर ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय शेतकरी जाणार नाहीत अशी भूमिका भाजपच्यापदाधिकाऱ्यांनी घेतली. तसेच ठोस आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा प्रशासनाचे काही अधिकारी निवेदन स्विकारायला आले. मात्र, महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी याठिकाणी येवून, निवेदन स्विकारून, ठोस आश्वासन दिले तरच हे आंदोलन मागे घेण्याची भूमिका घेण्यात आली.

सायंकाळी ७ वाजता महावितरणचे अधीक्षक अभियंता फारूक शेख यांनी आंदोलनस्थळी जावून, निवेदन स्विकारले. मात्र, लेखी आश्वासन देण्यास नकार दिल्याने आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला.