चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी ओप्पो इंडियाने ४, ३८९ कोटी रुपयांची करचोरी केल्याचे केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाच्या तपासातून उघड झाल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयाने बुधवारी दिली. ओप्पोने आयातीबाबत खोटी माहिती देऊन सीमा शुल्काचे दायित्व चुकवल्याचे तपासातून पुढे आले आहे.
ही चिनी स्मार्टफोन कंपनी वन प्लस, ओप्पो आणि रिअलमी या तीन नाममुद्रांद्वारे देशात स्मार्टफोनची विक्री करते. भारतात स्मार्टफोनचे उत्पादन, सुटे भाग जोडणे (असेम्बलिंग), • घाऊक व्यापार आणि मोबाइल फोन वितरण-विक्रीशी व्यवसायात ओप्पो इंडिया ही कंपनी गुंतलेली आहे. ग्वांगडोंग ओप्पो मोबाइल टेलिकम्युनिकेशन्स कॉर्पोरेशन – चीन अर्थात ओप्पो केंद्रीय चायनाची उपकंपनी असलेल्या ओप्पो मोबाइल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने ही करचोरी केली आहे.
तपासादरम्यान, महसूल गुप्तचर अधिकाऱ्यांनी ओप्पो इंडियाच्या कार्यालयाच्या आवारात आणि संबंधित व्यवस्थापनातील प्रमुख कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची झडती घेतली, ज्या आधारे पुरावे गोळा केले गेले असून ओप्पो इंडियाने मोबाइल फोनच्या निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या सुट्या घटकांच्या आयातीबाबत जाणूनबुजून चुकीची माहिती दिल्याचे समोर आले आहे. तसेच चुकीची माहिती देऊन कंपनीने २,९८१ कोटी रुपयांची कर सवलतदेखील मिळवली आहे.
चीनमधील विविध कंपन्यांनी स्वामित्वधन (रॉयल्टी) आणि परवाना शुल्काच्या रूपात पालक कंपन्यांना निधी पाठवला आहे. ओप्पो इंडियाने आयात केलेल्या वस्तूंच्या व्यवहार मूल्याच्या विपरीत चीनमध्ये धाडलेले ‘रॉयल्टी’ आणि ‘परवाना संबंधित शुल्क’ हे सीमाशुल्क कायद्याच्या उल्लंघन करणारे आहे. या माध्यमातून कंपनीने १,४०८ कोटींचे सीमा शुल्काची चोरी केली आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या तपासाअंती आता कंपनीला ४, ३८९ कोटी सीमा शुल्काची मागणी करणारी नोटीस बजावण्यात आली आहे.
गेल्या आठवड्यात दुसरी चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी विवोने भारतातील करदायित्व टाळण्यासाठी चीनमध्ये बेकायदेशीररीत्या ६२, ४७६ कोटी रुपये हस्तांतरित केल्याचे सक्तवसुली संचालनालय अर्थात ‘ईडी’कडून सांगण्यात आले