⁠ 
गुरूवार, एप्रिल 18, 2024

बढे सर पतसंस्थेचे होणार लेखा परीक्षण : दोषींवर होणार कारवाई

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ सप्टेंबर २०२२  सहकार विभागाच्या अवर सचिवांनी सहकार मित्र चंद्रकांत हरी बढे पतसंस्थेचे तीन महिन्यात चाचणी लेखा परीक्षण करून संस्थेचे आर्थिक नुकसान झाले असल्यास त्यास जबाबदार असणार्‍या पदाधिकारी व अधिकार्‍यांची यादी सादर करण्याचे आदेश दिल्याने माजी संचालकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. याबाबतची मागणी चंद्रकांत हरी बढे यांनी केली होती.

बढे सर पतसंस्थेवर 2009 पासून प्रशासक कारकिर्द सुरू झाली. त्यानंतर 2010 मध्ये निवडणूक होवून नवीन संचालकांनी पदभार स्वीकारला. यानंतर 2014 मध्य1े शासनाच्या आदेशानुसार संस्था अवसायनात काढण्यात आली. या दरम्यानच्या काळात संस्थेच्या माजी संचालंकावर सहकारी कायदा 1960 कलम 88 प्रमाणे कारवाई होवून 2010 मध्ये या संचालकांवर 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्यांवर संस्थेच्या थकीत कर्जाची जबाबदारी निश्चित करून प्रत्येकाच्या संपत्तीवर सहा कोटी 56 लाख रुपयांचा बोजा बसवण्यात आला तर या संधीचा फायदा घेऊन संस्थेचे कामकाज हाताळणार्‍या कर्मचारी अधिकार्‍यांनी किमान 25 ते 30 कर्जदारांना पूर्ण कर्ज फेड झाल्याचा दाखला देऊन त्यांच्या संस्थेत असलेल्या तारण असलेल्या मालमत्तेवरील बोजा कमी करण्यात आल्याचा आरोप आहे तर 31 मार्च 2021 च्या यादीत त्या सर्व कर्जदारांवर कर्जबाकी असल्याचे दिसून येत आहे.

2010 पासून हे प्रकरण सुरू असल्याचे माजी संचालक चंद्रकांत हरी बढे सर यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिस प्रशासन, तपास यंत्रणा, सहकारी संस्था, उपनिबंधक सहकारी संस्था, आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्याकडे सतत पाठपुरावा केल्याने या प्रयत्नांना अखेर यश आले. त्या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून अपहार झालेल्या रकमेबाबत संबंधीतांवर योग्य ती कारवाई होणार आहे तसेच किमान 14 ते 15 कोटी रुपये वसुल होवुन ठेवीदारांना मिळतील. यामुळे माजी संचालक चंद्रकांत हरी बढे सर व त्यांचे सहकारी संचालंकामध्ये समाधान व्यक्त होत आहे .

संस्थेद्वारा संचलित शहरातील श्रीमती गंगाबेन पटेल रुग्णालयातील फर्निचर, पंखे व इतर साहित्याची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली तसेच संस्थेचे पंढरपूर येथील भक्त निवास बंद करून तेथील गाद्या, सतरंजी, भांडी व खुर्च्या अशा अनेक साहित्याची प्रशासक काळात परस्पर विल्हेवाट लावण्यात आली असल्याने या प्रकरणाचीही सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी चंद्रकांत हरी बढे सर यांनी केली आहे.