⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

नातेवाइकांनी ५० हजारांच्या मदतीसाठी चुकीचा दावा दाखल केल्यास कारवाई

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२२ । कोवीड-१९ मुळे नातेवाइकाचा मृत्यूच्या अनुषंगाने ५० हजार रुपयांच्या सानुग्रह सहाय्यासाठी चुकीचा दावा दाखल केलेला आहे. त्यांच्याविरुध्द जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिला आहे. २० मार्चनंतर मृत्यू झालेल्यांच्या नातेवाइकांना सानुग्रह अनुदानासाठी अर्ज केवळ गाऱ्हाणे निवारण समिती मार्फत करता येणार आहे.


सर्वोच्च न्यायालयाने ४ ऑक्टोबर रोजी दिलेल्या आदेशानुसार कोवीड-१९ मुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाइकास ५० हजार इतके सानुग्रह सहाय्य देण्यात येत आहे. ही योजना १ डिसेंबर २०२१ पासून ऑनलाइन पध्दतीने कार्यान्वित करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महसूल विभागाने या योजनेची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. कोवीड १९ आजारामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाइकास ५० हजार इतके सानुग्रह अनुदान देण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे. कोवीडमुळे २० मार्च २०२२ पूर्वी मृत्यू झालेला असल्यास २४ मार्च २०२२ पासून ६० दिवसांच्या आत म्हणजेच २४ मे २०२२ पर्यंत मुदत आहे. २० मार्चपासून पुढे मृत्यू झाल्यास मृत्यूच्या दिनांकापासून ९० दिवसांच्या आत अर्ज सादर करावा लागेल. या योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी या मुदतीच्या नंतरचे अर्ज केवळ गाऱ्हाणे निवारण समिती मार्फत करता येतील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राऊत यांनी कळवले आहे. तसेच नियमाची काटेकाेरपणे पालन करण्याची सूचना दिली आहे.