जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जून २०२२ । जळगाव शहरात असलेल्या दुध फेडरेशन जवळील राजमालती नगरात रेशनचा मालाचा काळाबाजार होत होता. हि बाब पोलिसांच्या लक्षात आली. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी अडीच लाखांचा साठा जप्त करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिवाजी नगरातील दूध फेडरेशनजवळील राजमालती नगरातील मेहमूद बिसमिल्ला पटेल (रा.राजमालती नगर) यांच्या घरातून रेशनचा माल अवैधरित्या व परस्पर काळ्याबाजारात जात असल्याची माहिती दीपक गुप्ता यांनी तहसीलदार नामदेव पाटील यांना कळविली होती.
त्यानुसार नामदेव पाटील यांनी सोमवारी ६ जून रोजी सायंकाळी पुरवठा तपासणी अधिकारी डिगंबर भिकन जाधव यांच्यासह पथक घटनास्थळी रवाना केले होते. या पथकाने केलेल्या चौकशी सदरचे धान्य रेशनचे असल्याचे निष्पन्न झाले, मात्र त्याच्याजवळ कोणत्याच पावत्या नव्हत्या. अखेर तहसीलदार यांच्या पथकाने २२ हजार ५०० रुपये किमतीचा १५ क्विंटल गहू व २ लाख २५ हजार किमतीचा ९० क्विंटल तांदूळ, १ हजार रुपये किमतीच्या धान्याच्या गोण्या असा एकूण २ लाख ४८ हजार ५०० रुपये किमतीचा साठा व मालवाहू वाहने (एमएच ०६ एक्यू२१२४) आणि (एमएच १९ सीवाय ६०६७) जप्त करण्यात आली आहेत. पुरवठा तपासणी अधिकारी डिगंबर भिकन जाधव (रा.रायसोनी नगर) यांच्या फिर्यादीवरुन मेहमूद पटेल यांच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी करीत आहे.