⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

ग.स.अध्यक्षपदासाठी पारंपारिक फॉर्म्युला की महाविकास आघाडीचा फॉर्म्युला !

जळगाव लाईव्ह न्यूज । चिन्मय जगताप । जळगाव जिल्हा सरकारी कर्मचाऱ्यांची सहकारी पतपेढी म्हणजेच ग.स.सोसायटीच्या अध्यक्षपदाच्या निवडीचे काऊंटडाऊन अंतिम टप्प्यात असून उद्या अध्यक्षाची घोषणा होणार आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी आणि एकशे दहा वर्षाचा इतिहास असलेली ही सोसायटी आहे. आजवरच्या इतिहासाचा विचार केला तर अध्यक्षपदासाठी संचालकांच्या फोडाफोडीसाठी मोठा घोडेबाजार होतो.

नेहमीच कोणत्या ना कोणत्या तरी गटाचे नेते इतरांच्या गटाचे सदस्य फोडाफोडी करायचा प्रयत्न करतात आणि आपल्या गटाचा अध्यक्ष त्याठिकाणी बसवतात. दुसरीकडे राज्यात ऐनवेळी गेम करीत महाविकास आघाडीच्या फॉर्म्युलाची पुनरावृत्ती अनेक ठिकाणी केली जात आहे. महाविकासचा पॅटर्न अवलंबण्याचा प्रयत्न ग.स.सोसायटीमधील लोकसहकार व प्रगती शिक्षक सेना या पॅनेलने केला आहे. राज्याप्रमाणे सर्वाधिक सदस्य असलेल्या भाजपप्रमाणे ग.स.त सर्वाधिक संचालक निवडून आलेल्या सहकार पॅनलला दूर ठेवण्याचा प्रयत्न समसमान संचालक निवडून आलेल्या लोकसहकार व प्रगती शिक्षक सेनेने केला आहे. नवीन युतीमुळे ग.स.सोसायटीमध्ये यावर्षी ग.स. सोसायटीचा पारंपारिक फोडाफोडीचा फॉर्म्युला चालतो की महाविकास आघाडीचा फॉर्म्युला हिट होतो हे बघायची उत्सुकता आता संपुर्ण जळगावकरांना आहे.

ग.स.सोसायटीच्या निवडणुकीत मतदारांनी कोणत्याही गटाला संपूर्ण बहुमत दिलेले नाही त्यामुळे ग.स.मध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. या मोर्चेबांधणीत सहकार गटाचे नेते लोकसहकार गटाला व प्रगती सेना गटाला धक्का देत या दोन्ही गटातील संचालकांना आपल्या गळाला लावण्याच्या तयारीत आहेत.

तर दुसरीकडे लोकसहकार गट व प्रगती सेना गटाने एकत्र येऊन सहकार गटाला धोबीपछाड देणार असे उघडपणे सांगितले आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये लोकसहकार गट व प्रगती गट एकत्र येऊन अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आणि एक-एक वर्ष आलटून पालटून अध्यक्षपद स्वतःकडे ठेवणार अशी घोषणा यावेळी या गटांनी केली. यामुळे आता अध्यक्ष पदाला केवळ काही तास झाले असून ग.स.सोसायटीच्या इतिहासाप्रमाणे ऐनवेळी फुटाफूट होते की, नवीन इतिहास लिहिला जातो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.