जळगाव लाईव्ह न्यूज ।२२ मे २०२२ । मतदार संघातील नागरिक व शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर सत्तेतील आमदार असलो तरी तो सहन न करता शेतकऱ्यांसाठी लढाई सुरूच ठेवेल. अशी माहिती आमदार किशोर पाटील यांनी त्यांचे ‘शिवालय’ या निवासस्थानी पत्रकार परिषदेत दिली.
आमदार किशोर पाटील यांनी सत्ताधारी पक्षात असतांनाही शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात मागण्या पूर्ण न झाल्यास दि. २३ मे रोजी होणारे उपोषण करण्याचा इशारा दिला होता. या संदर्भात त्यांनी आज रविवार, दि. २२ मे रोजी पत्रकार परिषद घेत जळगांव पाट बंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता वाय. के. भदाणे यांनी पत्र पाठविले असून काम सुरू झाल्याबाबतचे फोटोही पाठविले आहे. यामुळे दि. २३ मे रोजी होणारे उपोषण स्थगित करण्यात येत असल्याचे सांगितले.
पाचोरा – भडगाव तालुक्यातील घोडसगाव, पथराड, पासर्डी व कजगांव येथील पाझर तलावांचे गेल्या अतिवृष्टीत मोठे नुकसान झाले आहे. याबाबत गेल्या सहा महिन्यांपूर्वी राज्याचे जलसंपदामंत्री ना. जयंतराव पाटील व पाटबंधारे विभागाच्या सचिवांसोबत बैठक घेऊन बांधारे दुरुस्ती करण्यासाठी निधी उपलब्ध केला होता. याबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या सोबत पाट बंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन काम सुरू करण्याबाबत सुचना देण्यात आल्या होत्या.
मात्र पावसाळा तोंडावर येवुन ही कामे सुरू झाली नाहीत. यामुळे सत्तेत असुनही उपोषणाचे हत्यार उपसावे लागले होते. मी गेल्या साडे सात वर्षांपासून सत्ताधारी पक्षाचा आमदार असलो तरी अनेक वेळा विज वितरण कंपनी शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याने अनेक वेळा मोर्चे काढून कार्यालयांना कुलुपही ठोकले आहे. मतदार संघातील नागरिक व शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर तो सहन न करता सत्तेतील आमदार असलो तरी सत्तेची तमा न बाळगता शेतकऱ्यांसाठी लढाई सुरूच ठेवेल. अशी माहिती आमदार किशोर पाटील यांनी त्यांचे ‘शिवालय’ या निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन करुन बोलतांना दिली.
यावेळी आमदार पाटील म्हणाले की, “पाट बंधारे विभागाने माझ्या उपोषणाची दखल घेत दि. २१ मे पासूनच प्रकल्पांच्या देखभाल व दुरुस्तीची कामे सुरू केल्याने मी दि. २३ मे रोजी होणाऱ्या उपोषणाला स्थगिती दिली आहे.”
गेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी होवुन पाचोरा व भडगाव तालुक्यातील चार प्रकल्पांचे मोठे नुकसान झाले होते. प्रकल्पांमध्ये यावर्षी पाण्याचा एक थेंब ही शिल्लक राहिला नसता. दरम्यान नुकसान झाल्यानंतर जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी प्रत्यक्ष येऊन पाहणी केली होती. व मंत्रालयात बैठक घेऊन निधी मंजूर झाल्यानंतर ही जिल्ह्यातील पाट बंधारे विभागाचे अधिकारी काम करण्यास ताळा ताळ करीत होते. पावसाळा तोंडावर असतांना ही काम न सुरू झाल्याने मला उपोषणाचे हत्यार उपसावे लागले होते. दरम्यान या बाबत विरोधकांनी जिल्ह्याचे पालकमंत्री शिवसेनेचे असतांना आमदारांवर उपोषणाची वेळ आल्याची टिका केली होती.
यावर पालकमंत्रीच काय परंतु मुख्यमंत्रीही माझेच आहेत. मात्र शेतकऱ्यांवर व नागरिकांवर अन्याय होत असेल तर तो सहन करण्याची माझी प्रवृत्ती नसल्याने मी उपोषणाचा मार्ग अवलंबला होता. यापुढेही अन्याय सहन करणार नाही. असे ही आमदार किशोर पाटील यांनी सांगितले. काम सुरू करण्याबाबत आ. किशोर पाटील यांना दि. २१ मे रोजी जळगांव पाट बंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता वाय. के. भदाणे यांनी पत्र पाठविले असून काम सुरू झाल्याबाबतचे फोटो ही पाठविले आहे. यामुळे दि. २३ मे रोजी होणारे उपोषण स्थगित करण्यात येत असल्याचे आ. किशोर पाटील यांनी सांगितले.